भिंत ढासळली तरी राष्ट्रवादीचा पाया मजबूत

डॉ. अमोल कोल्हे; पक्ष परिवर्तनाच्या टप्प्यावर

पिंपरी – राष्ट्रवादी कॉंग्रेस परिवर्तनाच्या मोठ्या टप्प्यावर आहे. पक्षात नवीन नेतृत्व तयार होत आहे. ही बदलाची वेळ आहे. या बदलासाठी पक्षाचे कार्यकर्ते जिद्दीने पेटले आहेत. भिंत ढासळली तरी राष्ट्रवादीचा पाया मजबूत आहे, येत्या विधानसभा निवडणुकीत त्याचा प्रत्यय सर्वांनाच येईल, असा विश्‍वास खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज (गुरुवारी) पिंपरी येथे व्यक्त केला.

खासदार झाल्यानंतर प्रथमच डॉ. कोल्हे यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील प्रश्‍नांसदर्भात महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी महापौर मंगला कदम, डॉ. वैशाली घोडेकर, अपर्णा डोके, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, जावेद शेख, अजित गव्हाणे, राजू मिसाळ, मोरेश्‍वर भोंडवे, प्रविण भालेकर, विक्रांत लांडे, शहर सुधारणा समिती सदस्य संजय वाबळे यांच्यासह राष्ट्रवादीचे नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सध्या सुरु असलेल्या उलथा-पालथीविषयी डॉ. कोल्हे म्हणाले की, जे पक्ष सोडून गेले, त्यांच्याबद्दल काहीही बोलणार नाही.

राष्ट्रवादी कॉंग्रेस हा सध्या परिवर्तनाच्या टप्प्यावर असलेला पक्ष आहे. 20 वर्षांपूर्वी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी नवीन नेतृत्वाला संधी दिली होती. नव्या तरुणांमधून महाराष्ट्राचे नेतृत्त्व त्यांनी घडवून दाखविले होते. आत्ताही तीच परिस्थिती आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कार्यकर्ता जिद्दीने पेटून उठला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत परिवर्तन झालेले दिसेल. एखादी भिंत जेव्हा पडते तेव्हा ती दोन पद्धतीने पडते. एक तर ती पायापासून कोसळते अथवा ती वरच्या बाजूने ढासळते. राष्ट्रवादी कॉंग्रेसची अवस्था सध्या वरच्या बाजूने ढासळणाऱ्या भिंतीसारखी आहे. ढासळणाऱ्या वीटा निखळून गेल्या आहेत. मात्र, पाया म्हणजेच कार्यकर्ते अजूनही मजबूत आहेत. येत्या 6 ऑगस्टपासून राज्यात वादळ येणार असल्याचे “शिवस्वराज्य’ यात्रेतून पहायला मिळेल.

महाजनादेश यात्रेसोबत होत असलेल्या शिवसुराज्य यात्रेच्या तुलनेबाबत बोलताना डॉ. कोल्हे म्हणाले, काहीजणांनी मुख्यमंत्री कोण असावा यासाठी यात्रा सुरु केली आहे. परंतु, शिवसुराज्य ही रयतेचा आवाज ऐकण्यासाठी शिवरायांचा मावळा काढत असलेली यात्रा आहे, असे डॉ. कोल्हे यांनी नमूद केले.

महापालिका आयुक्तांशी झालेल्या चर्चेबाबतची माहिती देताना डॉ. कोल्हे म्हणाले की, शहरातील कचरा प्रश्‍नी आयुक्तांकडून आढावा घेतला. मात्र, त्यांच्या उत्तरावर समाधान झाले नाही. कंत्राटदार डोळ्यासमोर ठेवून निविदा काढल्या जातात का, असा सवाल उपस्थित होत आहे. केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनत सुरू असलेल्या कामांची माहिती घेण्यात आली. चुकीची कामे होवू नयेत याबाबत आयुक्तांना सूचना करण्यात आल्या आहेत. भोसरी रुग्णालयाचे खासगीकरण न करता त्याचा सर्वसामान्य रुग्णांना उपयोग व्हावा, याबाबत आयुक्तांना सूचना करण्यात आल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

रेडझोनमधील बांधकामांच्या सार्वजनिक सुविधा बंद करण्याच्या आयुक्तांच्या निर्णयाविषयी डॉ. कोल्हे म्हणाले की, ही बांधकामे अनधिकृत असली तरी त्यात राहणारी माणसे अधिकृत आहेत. यापुढील बांधकामांबाबत आयुक्तांनी कठोर भूमिका घ्यावी. परंतु, आधीपासून राहत असलेल्या नागरिकांचा सहानुभूतीने विचार करावा. रेडझोनचा प्रश्‍न सुटावा यासाठी आपला अभ्यास सुरू आहे. पूर्ण अभ्यासाअंती संरक्षणमंत्र्यांसमोर हा प्रश्‍न मांडू, त्यामुळे हा प्रश्‍न निश्‍चित सुटेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराच्या आरोपांविषयी डॉ. कोल्हे म्हणाले की, महापालिकेच्या कारभारात जे “अनाजी पंत’ आहेत. त्यांना जनता निवडणुकीत हत्तीच्या पायाखाली देईल.

हे सत्तेच्या मस्तीचे प्रतीक

सध्या राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. राज्याला स्वतंत्र गृहमंत्र्याची मागणी पुर्ण होत नाही. सरकारला लोकांचा आवाजच ऐकू जात नाही. हे सत्तेच्या मस्तीचे प्रतिक तर नाही ना, असा सवाल डॉ. कोल्हे यांनी केला. एकीकडे गुन्हेगारी वाढत असताना दुसरीकडे राजकीय सूडातून राजकीय नेत्यांवर गुन्हे दाखल होत आहेत. ही निंदनीय बाब असल्याचेही त्यांनी सांगितले.

भोसरीत राष्ट्रवादीचाच आमदार

देशातील लाटेच्या विरोधात जाऊन शिरुरचा वेगळा निकाल लागला आहे. मागील निवडणुकीपेक्षा भोसरीतून विरोधकांचे 50 हजारांनी मताधिक्‍य कमी केले आहे. त्यामुळे कोणाला काहीही शंका असेल. परंतु, मला खात्री आहे, भोसरीचा आमदार राष्ट्रवादीचाच होणार आहे. याबरोबरच शहरातील इतरही दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादीचा आमदार असेल, असे डॉ. कोल्हे यांनी ठणकावून सांगितले. 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.