…तरी पुणे-सातारा महामार्ग अजूनही अर्धवटच

रिलायन्सला चारवेळा मुदतवाढ : खासदार बापट यांनी लोकसभेत उठविला आवाज

पुणे – पुणे-सातारा महामार्गावर 140 किलोमीटरच्या कामाला 2008 मध्ये मंजुरी मिळाली. 2010 मध्ये काम सुरू झाले. दि. 31 मार्च 2013 पर्यंत या मार्गाचे काम पूर्ण करणे अपेक्षित होते. तथापि, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रिलायन्स इन्फ्रा कंपनीला मार्ग पूर्ण करण्यासाठी चार वेळा मुदतवाढ दिली. त्यावर कंपनीने डिसेंबर-2018 पर्यंत मुदतवाढ मागितली. मात्र, अजूनही या मार्गावरील कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे ही कामे लवकर पूर्ण व्हावीत, अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी लोकसभेत केली आहे.

प्रश्‍नोत्तरांच्या तासात बापट म्हणाले, “पुणे हे मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक या शहरांना जोडणारे मध्यवर्ती ठिकाण आहे. शहराच्या चारही बाजूला राष्ट्रीय महामार्ग आहेत. त्यामुळे कायम रहदारी असते. सर्वच महामार्गांच्या रुंदीकरणाची कामे सुरू असली, तरी ठेकेदार कंपन्या अत्यंत संथगतीने ही कामे करत आहेत. निधीच्या कमतरतेमुळे नाशिक-पुणे महामार्गाचे रुंदीकरण अपूर्ण आहे.

यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. पुणे-सोलापूर महामार्ग रुंदीकरण भूसंपादनामुळे रखडले आहे. पुणे-सासवडदरम्यान वाहतूक कोंडी वाढली आहे. या मार्गाचे रुंदीकरण लवकर न केल्यास स्थिती गंभीर होईल, असेही बापट यांनी सांगितले. सेवा रस्ते, ओव्हर ब्रीज, अंडरपास यांची ही कामे अद्याप अपूर्ण आहेत. वारंवार मुदतवाढ देऊनही ही कामे पूर्ण होत नाहीत.

सध्या पावसाळा सुरू असल्याने अपूर्ण रस्त्यावरून जाताना वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. रस्ता खराब असल्याने वेळेचा व इंधनाचा अपव्यय होत आहे’

पुणे शहरालगतच्या महामार्गांची कामे पूर्ण झाल्यास पायाभूत सुविधा आणखी मजबूत होतील. यामुळे औद्योगिक कंपन्यांचा फायदा होईल, तसेच नवीन उद्योग पुण्यात येतील आणि विकासात भर पडेल. याबाबत केंद्र सरकारने लक्ष घालून या महामार्गांची कामे त्वरित पूर्ण करावीत.
– गिरीश बापट, खासदार, पुणे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.