कुडाळ, (प्रतिनिधी) – प्रत्येक भारतीयाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन देणारे भाजपचे सरकार महाराष्ट्रात पंधराशे रुपयांवर आले आहे. करदात्या जनतेच्या पैशातून लाडक्या बहिणीला सहाय्यता निधी देणारे भाजपचे पदाधिकारी आज उपकाराची भाषा बोलू लागलेत. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. त्या भ्रष्टाचारी लोकांबरोबर इथले विद्यमान लोकप्रतिनिधी जातात याचं आश्चर्य वाटते. पुतळ्याच्या उभारणीतही भ्रष्टाचार करणार्या महायुतीला हाकला असे सांगत खासदार अरविंद सावंत यांनी सातारा जावळी मतदारसंघातून अमित कदम यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार अमित कदम यांच्या प्रचारार्थ कुडाळ (ता. जावळी) येथे जाहीर सभेत ते बोलत होते. माजी आमदार सदाशिव सपकाळ, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख हनुमंत चवरे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एस. एस. पार्टेगुरुजी, लेक लाडकी अभियानाच्या प्रवर्तक अॅड. वर्षा देशपांडे, सौ. शितल कदम, शिवसेनेच्या उपनेत्या छाया शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते. खासदार अरविंद सावंत म्हणाले, छत्रपती शिवरायांच्या भूमितील जनता स्वाभिमानी आहे. ती कोणाला विकली जाणारी अवलाद नाही. येणार्या निवडणुकीत जनता तुम्हाला मतपेटीतून उत्तर देईल.
भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणात आणि मिंध्यांच्या साथीमुळे उद्धव ठाकरे यांना वर्षा बंगला सोडावा लागल्याने महाराष्ट्रातील जनता हळहळली. हीच जनता उद्याच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान करेल यात शंका नाही. सत्तेवर आल्यानंतर प्रत्येक कुटुंबाला वर्षाला सहा सिलेंडर प्रत्येकी पाचशे रुपयात देणार आहोत. पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव आमचे सरकार पाच वर्षे स्थिर ठेवेल. राज्यातील महिलांना सक्षम करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि तेही मोफत करण्यात येईल, महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर हे केल्याशिवाय गप्प बसणार नाही. अमित कदम म्हणाले, पंचवीस वर्षे झाली सातारा नगरपालिकेसह मतदारसंघातील सर्व सत्ता विद्यमान लोकप्रतिनिधींच्या ताब्यात आहे. येथील प्रश्न आजही तेच आहेत. काल शेंद्रे गटातील शिवसेनेच्या कार्यकर्त्याला मारहाण झाली. सामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय करून तुम्ही कोणाला न्याय देऊ पाहता? अजिंक्य बँक कर्मचार्यांवर अन्याय, साखर कारखान्यातील कर्मचार्यांची पिळवणूक, ऊस उत्पादकांची अडवणूक करून दबावाचे राजकारण, सर्वसामान्यांच्या अन्नात माती कालवण्याचा प्रयत्न या अन्यायाला सातारा -जावळीची जनता विटली आहे.
आपण सगळेच छत्रपतींच्या गादीला वंदन करतो. परंतु, ज्यांनी या गादीचा विचार सोडून दिला त्यांना आज त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भ्रष्टाचाराने पाडला याचा जाब विचारण्यासाठी अमित कदम यांना विधानसभेच्या सभागृहात पाठवा, असे आवाहन अॅड. वर्षा देशपांडे यांनी केले. यावेळी सदाशिव सपकाळ, एस. एस. पार्टेगुरुजी यांचीही भाषणे झाली.
सभेला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विश्वनाथ धनवडे, सचिन शेलार, शंकर सपकाळ, साधू चिकणे,विलास बेलोशे, बाळू यादव, संजय बेलोशे, महेश शिर्के, आनंदा पोफळे, विकास गोळे, कुडाळचे उपसरपंच सोमनाथ कदम, राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष रूपाली भिसे, सुरेश पार्टे, अॅड. शैला जाधव, हेमंत शिंदे, बाळासाहेब शिंदे, रवींद्र शेलार, गणेश अहिवळे, नितीन गोळे, संतोष चव्हाण, सचिन जवळ, बाळासाहेब शिर्के, दीपक पवार, राजाराम जाधव, अंकुश मानकुमरे, शिवसेनेचे जिल्हा उपसंघटक सादिकभाई बागवान, रवींद्र भणगे, शिवराय टोणपे, राजू नाईक व ग्रामस्थ उपस्थित होते.
जनतेने ठरवलंय आता पाडायचंय
इतिहासातील दाखला देत खासदार सावंत म्हणाले, ताराराणीने छत्रपती शाहू महाराजांशी तह केला होता. आताच्या काळात सातारचे दोन छत्रपती एकत्र आले आहेत. दोन बंधू एकत्र आले ही चांगली गोष्ट. मात्र त्यांची ही एकी जनतेसाठी नाही तर अमित कदम यांना पाडण्यासाठी आहे. हे दोन बंधू जसे एकत्र आले, तशी इथली जनता एकत्र आली आहे, अमित कदम यांना निवडून आणून विधानसभेत पाठवण्यासाठी. अमित कदम यांचा विजय ही काळ्या दगडावरची रेघ आहे.