बारामतीतही सत्ताधाऱ्यांत दुही

शहराचा विकास नगरसेवकांच्या दोन गटांमुळे खुंटला : पवार यांचे दुर्लक्ष झाल्याचा परिणाम

– दीपक पडकर

जळोची – बारामतीच्या राजकारणा प्रमाणेच विकासकामांची चर्चा राज्यात नव्हे तर देशात होते. राजकारणात कुठल्याही घडामोडी घडल्या तरी बारामती गढी पवार यांच्याच अधिपत्याखाली राहिलेली आहे. गेली अनेक दशके बारामतीची सत्ता पवारांच्या हाती आहे. परंतु, राज्यभरात राष्ट्रवादीतून अनेकांचे आऊट गोईंग सुरू असल्याने ते थोपविण्यात थोरले, धाकटे पवार व्यस्त आहेत. यातून दुर्लक्ष झाल्याने त्यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत नगरपालिकेच्या सत्ताधारी नगरसेवकांत दुही निर्माण झाल्याची चर्चा असून यातून बारामती शहराचा विकास खुंटला असल्याचे वास्तव समोर येत आहे.

राज्यातील राजकारणात राष्ट्रवादी कॉंग्रेसची पडझड सुरू असल्याने शरद पवार आणि अजित पवार यांनी यावर लक्ष केंद्रीत केले आहे. यातून बारामतीतील प्रशासकीय व राजकीय स्थितीकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याने “तुझ्या-माझ्या’ राजकारणातून बारामती शहराच्या विकासातच विस्कळीतपणा आला आहे. यामुळे अनेक भागात आजही मुलभूत सुविधा पुरविण्यात सत्ताधारी पक्ष अपयशी ठरतो आहे. यातून शासकीय अधिकारीही वेठीस धरले जात असल्याने गटागटाचे राजकारण प्रशासकीय कामातही अडथळा ठरू लागले आहे.

शहरी समस्या घेऊन कोणत्या गटाकडे जावे, असा प्रश्‍न नागरिकांपुढे निर्माण होत असल्याने यातून शहरातील बिघडलेली स्थिती लक्षात येवू शकते. शहराच्या नागरी समस्या मार्गी लावण्याकरीता दोन्ही गटाकडून प्रशासनाला सहकार्यासह उपाययोजना करणे अपेक्षित आहे. परंतु, दोन्ही गटांकडून समस्या सोडविण्यापूर्वीच राजकीय श्रेयासाठी वाद सुरु होतो; यातून नागरिकांची मात्र फरफट होते आहे. या स्थितीला शासकीय अधिकारीही दुजोरा देत आहेत. बारामतीकर घराणेशाही व हुकुमशाहीकडे पाहून नाही तर पवार यांच्या कार्यकतृत्त्वाकडे पाहून पक्षाला मतदान करतात. मात्र, याचाच विसर पवार यांच्या आशिर्वादाने मोठे झालेल्या नगरसेवकांना पडला आहे. यामध्ये पवारांकडून नेमकी भूमिका घेतली जावी अशी अपेक्षा बारामतीकरांकडून व्यक्त केली जात आहे.

आत्मपरिक्षणाची गरज
बारामती नगरपालिकेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता असूनही सत्ताधारी नगरसेवक कोणाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, असा प्रश्‍न पडतो. कारण, विरोधकांची अडचण नको म्हणून अनेक प्रकल्प शासनाची विना मंजुरी घेता सुरु केले गेले यात विरोधकांनी राजकीय खेळी करीत सत्ताधाऱ्यांना तोंडघशी पाडले, अशी स्थिती असेल तर याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसने आत्मचिंतन करणे गरजेचे असल्याचे राजकीय विश्‍लेषकांनी म्हंटले आहे.

बारामतीकरांनी निवडून दिल्याने त्यांच्याबाबत विचार महत्त्वाचा. गटातटाचा विचार करून शहराचा विकास होणार नाही. त्यामुळे मी त्या गोष्टींना प्राधान्य देत नाही. वरिष्ठांच्या सूचना, मार्गदर्शनानुसार विकासकामे सुरू आहेत. नागरिकांनी केंव्हाही संपर्क साधून प्रश्‍न मांडावेत.
– पोर्णिमा तावरे, नगराध्यक्ष, बारामती


बारामतीत गटबाजी नाही, सर्व जण एकोप्याने काम करीत आहोत. सत्ताधारी नगरसेवकांत दोन गट पडल्याचे विरोधकांकडून भासविले जात आहे. शहरातील कामे प्रशासकीय प्रक्रियेद्वारेच सुरू आहेत. मात्र, याबाबतही नागरिकांत संभ्रम निर्माण केला जात आहे.
– इम्तियाज शिकीलकर, बारामती शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)