काश्‍मीर खोऱ्यातही आता ‘गणपती बाप्पा मोरया’…

दगडूशेठ गणपतीची प्रतीकात्मक मूर्ती स्थापन होणार


मराठा बटालियनच्या सैनिकांनी व्यक्‍त केली होती इच्छा

पुणे – काश्‍मीर खोऱ्यात दगडूशेठ गणपतीची प्रतीकात्मक मूर्ती स्थापन करण्यात येणार आहे. मराठा बटालियनच्या सैनिकांनी मूर्ती स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली आणि ट्रस्टने देखील “श्रीं’ची हुबेहुब मूर्ती देण्याचे मान्य केले. त्यानुसार ही मूर्ती रेल्वेने काश्‍मीरकडे रवाना झाली.

भारतीय लष्कराच्या 6 मराठा बटालियनच्या वतीने जम्मू-काश्‍मीरच्या गुरेज सेक्‍टर हे मंदिर उभारण्यात आले आहे. तेथे दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती असणाऱ्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची इच्छा सैनिकांनी व्यक्त केली. त्याप्रमाणे कमांडिंग ऑफिसर कर्नल विनोद पाटील यांनी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्याकडे विनंती करणारे पत्र ट्रस्टला पाठविले.

या गणेश मूर्तीची निर्मिती शिल्पकार विवेक खटावकर व विपुल खटावकर यांनी केली आहे. दगडूशेठ गणपती मंदिरात धार्मिक विधी करुन ही फायबर ग्लास मधील 36 इंचाची मूर्ती सैनिकांकडे सोपविण्यात आली. सन 2011 पासून 6 मराठा बटालियन आणि दगडूशेठ गणपती ट्रस्टचे मैत्रीचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या विनंतीचा सन्मान राखून मूर्ती भेट म्हणून पाठविण्याचे ठरविले, असे ट्रस्टकडून सांगण्यात आले.

“आमचे युनिट सध्या गुरेज सेक्‍टर, जम्मू-काश्‍मीरमध्ये कार्यरत आहे. आम्ही येथे एक गणेश मंदिर साकारले आहे. मंदिरामध्ये दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतीकात्मक गणेश मूतीर्ची कायमस्वरूपी स्थापना करू इच्छितो. बाप्पांचा आशीर्वाद सर्व सैनिकांना मिळेल आणि अप्रतिम मूर्तीमुुळे मंदिराची शोभा वाढेल. याकरीता आपण अडीच फुटांची गणेश मूर्ती भेट म्हणून द्यावी,’ असे 6 मराठा बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विनोद पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.