पुणे : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली आहे. संजय राऊत यांना मी कोणत्याही पद्धतीचा सल्ला दिलेला नाही, एवढेच नाही तर त्यांना सल्ला देण्याचं धाडस परमेश्वरही करणार नाही,”असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी राऊतांवर उपहासात्मक टीका केली आहे.
चंद्रकांत पाटलांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही. त्यांचा पक्ष आता झिजतोय त्याकडे त्यांनी लक्ष द्यावं अशी टीका संजय राऊतांनी केल्याचं सांगत पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारला. तुम्ही म्हणालेला की मुख्यमंत्र्यांनी संजय राऊतांना आवारावं, यावर संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिल्याचे पत्रकारांनी सांगितले. या प्रश्नावर उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी, “मी संजय राऊतांना सल्ला दिलेला नाही. त्यांना सल्ला देण्याचं धाडस परमेश्वरही करणार नाही,” असे उत्तर दिले.
चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख मित्र असा केला. “उद्धवजी काहीही झालं तरी आमचे मित्र आहेत. ते मानोत न मानोत काहीही झालं तरी एकतर्फी मैत्री आहे. हिंदूहृदयसम्राट बहाळासाहेब ठाकरेंचे ते चिरंजीव आहेत. अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलंय. कोण संजय राऊत ओ? काल परवा आले शिवसेनेत आणि ते कोणाला शिकवताय?,” असा टोला त्यांनी संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना लगावला.
“आम्ही उद्धवजींना एवढं म्हटलं की आम्हाला जे आकलन आहे त्यानुसार संजय राऊत पवारसाहेबांनी देलेल्या अजेंड्यावर काम करतायत. जो अजेंडा तुम्हाला अडीच वर्ष होत आल्याने मुख्यमंत्री पदावरुन घालवणे. डायरेक्ट सुप्रियाताईंना मुख्यमंत्री करु शकत नाहीत. ते हे सगळं मान्य करणार नाहीत. संजय राऊत (मुख्यमंत्री) झाले तरी त्यांना सुप्रियाताई झाल्यासारखं आहे. मातोश्रीचा पाया उखडण्याचं काम चाललेलं आहे, हे मला वाटलं ते मी म्हटलं. आता तुम्ही माझ्या म्हणण्यावर बंदी आणणार का?,” असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी विचारला.