करोना काळातही मुद्रांक शुल्कातून कोटींची उड्डाणे

सह-दुय्यम निबंधक कार्यालयांना प्रत्येकी शंभर कोटींपेक्षा अधिक उत्पन्न 


शुल्कात सवलत असल्याने दस्त नोंदणीत मोठी वाढ

– दीपेश सुराणा

पिंपरी – करोनाकाळातही मुद्रांक आणि नोंदणी शुल्कातून गेल्या वर्षभरात शहरातील सह-दुय्यम निबंधक कार्यालयांना प्रत्येकी शंभर कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले आहे. त्यातही मुद्रांक शुल्कात दिलेल्या सवलतीने मार्च महिन्यामध्ये दस्त नोंदणीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली. असे असतानाही मुद्रांक शुल्क दरातील कपात आणि करोनामुळे सुमारे दोन महिने दस्त नोंदणी बंद असल्याने 2019-20 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2020-21 या वर्षात उत्पन्नामध्ये 13 ते 23 टक्‍क्‍यांची घट झाली आहे.
करोनाच्या संकटात बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने 1 सप्टेंबर 2020 पासून मुद्रांक शुल्कात 3 टक्के सवलत दिली होती. ही सवलत 31 डिसेंबरपर्यंत होती. तर, 1 जानेवारीपासून 31 मार्चपर्यंत मुद्रांक शुल्कात 2 टक्के सवलत दिली होती.

चिंचवड येथील हवेली क्रमांक 5 या सह-दुय्यम निबंधक कार्यालयात फेब्रुवारी महिन्यामध्ये दररोज सरासरी 30 ते 40 दस्तांची नोंदणी होत होती. तुलनेत मार्च महिन्यामध्ये दररोज सरासरी 30 ते 50 दस्तांची नोंदणी झाली. राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात दिलेल्या सवलतीचा फायदा घेण्यासाठी मार्च महिन्यातील शेवटच्या 15 दिवसांमध्ये दस्त नोंदणीत चांगलीच वाढ झाली.

त्याशिवाय, पंतप्रधान आवास योजनेतील घरांसाठी देखील कार्यालयात दस्त नोंदणी झाली. त्यामुळे एकट्या मार्च महिन्यात 1 हजार 498 दस्त नोंदविले गेले. त्या माध्यमातून मुद्रांक व नोंदणी शुल्कातून 24 कोटी 16 लाख 83 हजार 152 रुपयांचे उत्पन्न मिळाले. कार्यालयाला आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 8 हजार 804 दस्तांची नोंदणी झाली. त्यातून 123 कोटी 51 लाख रुपयांचा महसूल मिळाला, अशी माहिती सह-दुय्यम निबंधक सविता बुरसे यांनी दिली.

पिंपरीतील हवेली क्रमांक 26 या सह-दुय्यम निबंधक कार्यालयात मार्च महिन्यात दररोज सरासरी 70 दस्तांची नोंदणी झाली. महिनाभरात कार्यालयाला मुद्रांक आणि नोंदणी शुल्कातून 27 कोटी 86 लाख 6 हजार 530 रुपयांचे उत्पन्न मिळाले. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये एकूण 5 हजार 456 दस्तांची नोंदणी झाली. त्या माध्यमातून कार्यालयाला वर्षभरात मुद्रांक व नोंदणी शुल्कातून 103 कोटी 59 लाख 63 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले, अशी माहिती सह-दुय्यम निबंधक आशा लाडके यांनी दिली.

31 मार्चपूर्वी मुद्रांक शुल्क भरणाऱ्यांना सवलतीचा फायदा
ज्या नागरिकांनी 31 डिसेंबरपूर्वी मुद्रांक शुल्क भरून दस्तावर स्वाक्षरी केली आहे त्यांना 30 एप्रिलपर्यंत दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करता येणार आहे. त्याशिवाय, 31 मार्चपूर्वी मुद्रांक शुल्क भरलेल्या नागरिकांना त्या तारखेनुसार पुढील चार महिन्यांत केव्हाही दस्त नोंदणी करता येणार आहे. संबंधितांना मुद्रांक शुल्कातील सवलतीचा फायदा मिळणार आहे.

मार्चमध्ये दिवसाला सरासरी 75 दस्त
पिंपरी येथील हवेली क्रमांक 18 या दस्त नोंदणी कार्यालयामध्ये फेब्रुवारी महिन्यात 1006 दस्तांची नोंदणी झाली. दररोज सरासरी 50 दस्तांची नोंदणी झाली. तर, मार्च महिन्यात दररोज सरासरी 75 दस्तांची नोंदणी झाली. मार्च महिन्यात 1 हजार 698 दस्तांची नोंदणी झाली. महिनाभरात कार्यालयाला मुद्रांक आणि नोंदणी शुल्कातून 30 कोटी 81 लाख 46 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये कार्यालयात एकूण 9 हजार 174 दस्त नोंदविले गेले. वर्षभरामध्ये कार्यालयाला नोंदणी व मुद्रांक शुल्कातून 128 कोटी 26 लाख 59 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती सह-दुय्यम निबंधक एस.एस.गबाले यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.