उपायुक्तांच्या भेटीनंतरही मांजरी बुद्रुक येथील कचराकोंडी कायम ?

नागरिकांनी स्वतःहून कचरा वर्गीकरण करण्याचे सरपंच शिवराज घुले यांचे आवाहन

मांजरी –  मांजरी बुद्रुक गाव महापालिकेत समाविष्ट होवून आज १९ दिवस उलटले आहेत. तरीही येथील कचरा समस्या कायम आहे. रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत. ऐन पावसाळ्यात महापालिकेच्या बेफिकिरीमुळे कचरा कुजून परिसरात दुर्गंधी सुटून सामान्यांना साथीच्या आजाराला तोंड द्यावे लागत आहे. कचरा उचलला नाहीतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अजित देशमुख व हडपसर- मुंढवा क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त प्रसाद काटकर यांनी १० जुलै रोजी गावात येऊन कचरा समस्या जाणून घेतील होती.तेव्हा ओपन डंपिंग करण्यासाठी जागा शोधण्यात येत असून उपलब्ध असलेल्या जागेची माहिती घेऊन पुढील कार्यवाहीचे आश्वासन देण्यात आले होते.दरम्यान आठवड्यानंतरही मांजरी बुद्रुक परिसरातील कचरा कुंड्या ओसंडून वाहत असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मांजरी बुद्रुक ग्रामपंचायतीने परिसरात ठिकठिकाणी कचरा कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत.

गाव महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतरही कुंड्या त्याच जागेवर आहेत.आता त्याच कुंड्या त्यातील कचरा वेळेवर न उचलल्याने कचराकुंडी भोवतालीचा संपुर्ण भाग कचरामय होऊन त्यात भर म्हणून की काय मोकाट जनावरे, कुत्र्यांचा उपद्रव आणखी वाढतो. त्यातच ऐन पाऊसाळ्यात महापालिकेच्या बेफिकिरीमुळे कचरा कुजून परिसरात दुर्गंधी सुटून सामान्यांना साथीच्या आजाराला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने नागरिकांचे आरोग्यहित लक्षात घेवून कचऱ्याची नियमित विल्हेवाट लावावी ,अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.दरम्यान येथील कचरा लवकरात लवकर उचलला नाही तर ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शैलेंद्र बेल्हेकर यांनी दिला आहे.
चौकट

नागरिकांनी स्वतःहून कचरा वर्गीकरण करावे
ग्रामपंचायत अस्तित्वात असताना नागरिकांना ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याचे आवाहन वारंवार केले जात होते. यासाठी ग्रामपंचायत माध्यमातून कचरा वर्गीकरण करण्यासाठी घरोघरी बकेट वाटप करण्यात आल्या आहेत. आता गाव महापालिकेत समाविष्ट झाले आहे. आणि कचरा समस्या कायम आहे. त्यासाठी नागरिकांनीच स्वतः हुन ओला – सुका कचरा वेगळा करावा. याशिवाय सोसायटीने कचरा कसा जिरवता येईल हे पहावे. गाव मोठे आहे तेवढा कचरा जमा होत आहे.तो जिरवणे किंवा त्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेला वेळ हा द्यावाच लागणार आहे. महापालिका प्रशासनानेही गावची कचरा समस्या सोडवण्यासाठी तातडीचे प्रयत्न केले जावेत.
शिवराज घुले,
सरपंच- मांजरी बुद्रुक ग्रामपंचायत. 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.