जुजबी कारवाईनंतरही मुळा नदीपात्रात वाळू उपसा सुरूच 

संगमनेर – तालुक्‍यातील घारगाव पोलिसांनी बुधवारी मुळा नदीपात्रातून बेकायदेशीर वाळूचे उत्खनन करून त्याची वाहतूक करणारा फक्त एक पिकअप ताब्यात घेऊन कारवाईची देखावा केला आहे. मात्र इतर बहुतांशी ठिकाणी वाळूचोरी जोमात चालू असल्याचे मुळा काठच्या नागरिकांनी सांगितले. दैनिक प्रभातने बुधवारी संगमनेरात अवैध व्यवसाय सुरू या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून त्याकडे पोलीस विभागाचे लक्ष वेधले होते. घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुळा नदीपात्रात कोठे खुर्द, कोठे बुद्रुक, तांगडी, बोरबण, घारगाव, शेळकेवाडी, अकलापूर, येठेवाडी, खंदारमाळवाडी, मोरेवाडी, मांडवे बुद्रुक, साकुर, जांबूत (टेकडवाडी केटीवेअर) याठिकाणी मोठ्या प्रमाणात राजरोस वाळू उपसा सुरू आहे.

अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अवैध व्यावसायीकांशी संबंध आढळले, तर त्यांच्यावर थेट कारवाईचा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी दिल्यानंतर घारगाव पोलिसांनी कातडी बचाव भूमिका घेत विशेषत: वाळू तस्करांवर काही प्रमाणात कारवाई करत अवैध धंदे बंद असल्याचे भासविण्यासाठी वाळू तस्करांवर कारवाई केली. मात्र या व्यवसायाशी संबंधित असलेले कर्मचारीच अनेक जुजबी कारवायांत तक्रारदार असल्याचे दिसून आले. मागील आठवड्यापासून पोलिस ठाण्यातील कागद रंगविण्याचा खेळदेखील थांबण्यात आल्याने पोलिसांच्या मूक सहमतीने दिवस-रात्र राजरोस वाळू नदीपात्रात सुरू आहे.

दैनिक प्रभातने संगमनेरात अवैध व्यवसाय सुरू या मथळ्याखाली वार्तांकन करताच घारगाव पोलिसांनी कारवाईचा देखावा करत मुळा नदीपात्रात येठेवाडी परिसरातील तितरवस्ती शिवारात दुपारी साडेबाराच्या सुमारास पिकअप (क्र. एमएच-12 एफडी-971) वाळू भरत असताना कारवाई केली. पोलिसांना पाहताच वाळू भरणाऱ्या दोघांनी पळ काढला. पोलसांनी पाठलाग कारत राधाकृष्ण ऊर्फ मंगेश अंथाराम वाडगे (रा. येठेवाडी) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, पळून जाणाऱ्या इसमाचे नाव संजय ऊर्फ रेज्या शिवाजी वाडगे (रा. येठेवाडी) असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी पिकअप व अर्धा ब्रास वाळू, असा चार लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून, दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

राजकीय नेत्यांचा समावेश

घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुळा नदीपात्रा मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. सर्वाधिक वाळू वाहतूक जांबूत केटीवेअर खालील नदीपात्रात राजरोस केली जात आहे. यामध्ये एका ग्रामपंचायत उपसरपंचासह सदस्याचा समवेश असल्याने पोलीस अर्थपूर्ण संबंधातून याकडे दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी मोठे मासे सोडून फक्त एका किरकोळ वाळू तास्कारावर कारवाई केली असल्याची चर्चा नदीकाठच्या गावांमध्ये होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.