सात टाके पडूनही सतीशने दिली तुल्यबळ लढत! सामना गमावला, पण मने जिंकली

टोकियो – भारताचा अव्वल मुष्टियोद्धा सतीश कुमार याला लढच गमवावी लागली असली तरीही त्याने दाखवलेल्या जिगरबाज वृत्तीने त्याने मने जिंकली आहेत. 91 किलो वजनी गटात खेळणाऱ्या सतीशचे यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आले असले तरीही त्याने उपांत्यपूर्व फेरीत उझबेकिस्तानचा गतविजेता आणि विश्वविजेता बखोदिर जलोलोवला दिलेली लढत चांगलीच चर्चेत आली आहे.

या लढतीत तिन्ही फेऱ्यांत जलोलोवने वर्चस्व राखले. त्याने सतीशचा 5-0 असा पराभव करून पदक निश्‍चित केले. यापूर्वीच्या सामन्यात सतीशला दुखापत झाली होती. त्याचे या सामन्यात खेळणेही अनिश्‍चित होते. मात्र, सात टाके पडूनही सतीशने हा सामना खेळला व त्यात चांगली लढत दिली. जमैकाच्या रिकार्डो ब्राउनविरुद्धच्या सामन्यात सतीशच्या हनुवटीला तसेच उजव्या डोळ्याला दुखापत झाली होती. त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली होती व त्याच्या जखमेवर सात टाकेही घालण्यात आले होते.

यानंतरही त्याने रविवारी सामना खेळण्याचा निर्णय घेतला. या लढतीदरम्यान सतीशच्या जखमेवरही जलोलोवचा ठोसा बसला होता व त्या जखमेतून रक्तस्रावही होत होता. तरीही सतीश डगमगला नाही व त्याने खेळ सुरूच ठेवला. सतीशच्या याच जिगरबाज खेळाचे प्रचंड कौतुक झाले.

या स्पर्धेत भारताचे तब्बल 9 खेळाडू सहभागी झाले होते. मात्र, वोललिना वगळता एकालाही पदक निश्‍चित करता आलेले नाही. तसेच हेविवेट गटात खेळणारा सतीश भारताचा पहिलाच मुष्टियोद्धा होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.