चार वर्षे होऊनही पुणे मेट्रोचे निम्मे काम अपूर्णच

नियोजन बारगळले, घोषणा हवेत विरल्या; मेट्रो प्रवासासाठी करावी लागणार प्रतीक्षा 

पिंपरी – पुणे मेट्रोने रविवारी मोठ्या थाटा-माटात आपला चौथा वर्धापनदिन साजरा केला. सोबतच मेट्रोने आतापर्यंत केलेल्या कामाची यादीही सांगितली त्यातच मेट्रोने आपले 48 टक्‍के काम पूर्ण झाल्याचा दावा केला आहे. मेट्रो मार्गिका एक आणि दोन या दोन्ही मार्गांवर 2021 पर्यंत मेट्रो धावणे अपेक्षित होते. परंतु मार्गिका एकवरील (पिंपरी ते स्वारगेट) कामाची स्थिती पाहता मेट्रो प्रवासासाठी नागरिकांना अजून वर्षभराची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे दिसत आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरात दापोडीच्या हॅरिस पूल ते चिंचवडच्या मदर टेरेसा उड्डाणपुलापर्यंत असे एकूण 7.50 किलोमीटर अंतराचा मार्गास महामेट्रोने प्राधान्यक्रम दिला होता. डिसेंबर 2019 पर्यंत किंवा जानेवारी 2020 मध्ये येथील काम पूर्ण करून मेट्रो संचलन केले जाणार असल्याचा दावा महामेट्रोकडून वारंवार केला जात होता. पुढे ही डेडलाइन मार्च 2020 पर्यत वाढविण्यात आली. परंतु हे सर्व दावे मात्र फोल ठरले आहेत. करोनामुळे मेट्रोचे काम काही काळ बंद ठेवावे लागले, पण, मार्च 2020 मध्ये मेट्रो सुरू करण्यात महामेट्रोचे अधिकारी अपयशी ठरले आहेत.

याच कार्यालयात 2019 मध्ये महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी दावा केला होता की पुढील वर्षी पिंपरी ते फुगेवाडी या प्रायोरिटी रुटवर मेट्रो धावेल. परंतु दोन-तीन वेळा प्रात्यक्षिक दाखविण्याव्यतिरिक्त विशेष काहीच झाले नाही.

अनेक कामे अर्धवट; रस्ते दुरुस्तीही दुर्लक्षित
सहापैकी केवळ संत तुकारामनगर मेट्रो स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात आहे. उर्वरित पिंपरी-चिंचवड महापालिका भवन, नाशिक फाटा, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी या मेट्रोस स्टेशन कामे अद्याप अर्धवट स्थितीत आहेत. पिलरचे रंगकाम अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. कामामुळे खराब झालेले रस्ते दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. दुरूस्ती कामाचा दर्जा ही राखला जात नाही. तसेच, दुभाजकावर रोपे लावून सुशोभीकरणाचे काम रेंगाळले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.