खालापूर, {समाधान दिसले} – तालुक्यातील चौक गावापासून अडीच तासाच्या अंतरावर असणाऱ्या आरकसवाडी या आदिवासी वस्तीकडे जाण्यासाठी वाटेत असणारी नदी ओलांडून जावे लागते. आजपर्यंत या नदीवर पुलाची बांधणी झाली नसून गेली कित्येक वर्षांपासून येथील नागरिक पुलाच्या प्रतीक्षेत आहेत.
पूल नसल्याने येथील नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. अशात येथून एक हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग समोर आला आहे. आरकसवाडी येथे नदीवर पूल नसल्याने एक मृत महिलेची अंत्ययात्रा नदीच्या पाण्यातून न्यावी लागली आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटून गेली. परंतु अद्याप देशातील अनेक भागात मुलभूत सुविधांची पूर्तता झालेली नाही. महाराष्ट्रात तर ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रस्ते, वीज, पाणी, पूल अशा पायाभूत सुविधांचीच वाणवा आहे. कधी शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून जावे लागते,
तर कुठे प्रसूतीसाठी महिलेला झोळी करून न्यावे जाते. अशात आरकसवाडी येथील घडलेला हा प्रसंग, ज्यात मृत्यूनंतरही मरणयातना सुटल्या नसल्याचे दिसत आहे आणि हे सर्व नदीवरील पुलाअभावी घडले आहे.
कमल बाळु चौधरी यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे अंत्यसंस्कार कुठे आणि कसे करावे, असा प्रश्न त्यांच्या आप्तांना पडला. कारण ना जवळ नदीवर पूल होता, ना जवळ स्मशानभूमी होती.
शेवटी तिरडी डोक्यावर घेऊन कंबरेएवढ्या पाण्यातून वाट काढत नातेवाइकांना त्यांचा मृतदेह न्यावा लागला आणि अंत्यविधी करण्यात आला. जिवंतपणी ना कुठल्या सुविधा मिळाल्या आणि मरणानंतरही मरणयातना सहन कराव्या लागल्याची प्रतिक्रिया नातेवाइकांनी दिली.
पुलाचे भूमिपूजन नावापूरतेच –
काही महिन्यांपूर्वी या नदीवरील पुलाचे भूमिपूजन उरण मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांनी केले. मात्र अद्याप येथे एक दगड देखील पुलाच्या बांधकामासाठी पडलेला नाही. पूल नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. शाळा नदीच्या पलीकडे असल्याने शाळेत जायचे असेल तर विद्यार्थ्यांना नदी ओलांडून जावे लागते.
बिनपत्र्याची स्मशानभूमी –
सामाजिक कार्यकर्ते फिरोज शेख यांनी सांगितले की, जवळ असलेल्या एका स्मशानभूमीवर पत्रे नसल्याने अंत्यविधीसाठी प्रेतावर बॅनर धरावा लागतो. ना पत्रे, ना लाइट, ना कुठल्या सुविधा. अशा दुरवस्था असलेल्या स्मशानभूमीत नातेवाइक मृत झालेल्या व्यक्तीला शेवटचा निरोप देत आहेत.
आमदार महेश बालदी यांनी काही महिन्यांपूर्वी आरकसवाडी येथील नदीवरील पुलाचे भूमिपूजन केले होते. परंतु तिथे अद्याप एक दगड लागलेला नाही. हे सत्ताधारी आमदार सामान्यांना पत्च आश्वासने देतात, मात्र पूर्तता करत नाही. त्यामुळे येत्या विधानसभेला सर्वसामान्यांची दिशाभूल करणाऱ्या लोकप्रतिनिधीला घरी बसवणे गरजेचे आहे. – मनोहर भोईर, जिल्हाप्रमुख, शिवसेना उबाठा
केंद्राकडून आणि राज्याकडून आम्हा आदिवासी बांधवांसाठी वेगवेगळ्या माध्यमातून निधी येतो. मात्र, आमच्यापर्यंत तो पोहचत नाही. आमच्या आरकसवाडी येथील अंत्ययात्रेची अवस्था पाहून परिस्थिती लक्षात येइल. आम्हाला आजही अंत्यविधीसाठी पुराच्या पाण्यातून जीव धोक्यात टाकून प्रवास करावा लागतोय. देशाला स्वातंत्र्य होऊन ७५ वर्षे झाली, पण आम्हाला अद्याप रस्ता, पाणी, वीज नाही. – राजू उघडे, ग्रामस्थ