फलटण, (प्रतिनिधी) – देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरी फलटण मतदार संघाचा आमदार स्वतंत्र नाही . फलटणचा मतदार संघाचा आमदार स्वतंत्र करणार असून नेतृत्व नाही तर प्रतिनिधी म्हणून मी फलटणकर हा स्वाभिमान निर्माण करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (खा. शरदचंद्र पवार) गटाचे इच्छुक उमेदवार बुवासाहेब हुंबरे यांनी सांगितले.
पञकार परिषदेत पुढे बोलताना हुंबरे म्हणाले, स्वातंत्र्य मिळवून तब्बल पंचाहत्तर वर्षे झाली मात्र फलटण- कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून गेलेल्या आमदारांना स्वातंत्र्य नाही.
फलटण तालुक्याचा विकास नाही, कमिन्स आली मात्र इतर कंपन्या आल्या नाहीत, नाईकबोमवाडी एमआयडीसीच पुढं काय झाले? असे एक ना अनेक प्रश्न सुटत नसल्याने मी यावेळी विधानसभा निवडणूक लढवणार आहे. फलटणच्या विकासाला चालना देण्यासाठी आयटी सेक्टर फलटणमध्ये आणणार आहे.
श्री. हुंबरे म्हणाले, मतदारसंघात अजिबात विकास झाला नसून या आमदारांना अजिबात स्वातंत्र्य नाही, विकासाची दूरदृष्टी नाही, शेतकऱ्यांचे बचत गट नाहीत, युवकांना रोजगार नाही खा. शरद पवारांच्या माध्यमातून कमिन्स सारखा प्रोजेक्ट उभा राहिला परंतु पुढे इतर कंपन्या आल्या नाहीत हे सत्ताधारी लोकांचे अपयश आहे.
महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यासाठी खा. सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली किमान एका गावात दहा तरी महिलांचे बचत गट स्थापन करणार असून युवक बेरोजगार राहणार नाहीत. ते बारामती, पुणे, मुंबईत न जाता त्यांना फलटण तालुक्यात संधी उपलब्ध करून देण्यासाठी माझा प्रयत्न राहील.