वॉशिंगटन – सूर्यमालेमधील गुरु हा आकाराने सर्वात मोठा ग्रह आहे. या ग्रहाचा चंद्र “युरोपा’ म्हणून ओळखला जातो. या युरोपा ग्रहावर पाण्याचे बाष्प आढळल्याची माहिती अमेरिकी अंतरिक्ष संस्था “नासा’कडून देण्यात आली आहे.
गुरुच्या चंद्रावर पाणी आढळल्याने या उपग्रहावर मोठा समुद्र अस्तित्वात असल्याची शक्यता वैज्ञानिकांकडून दर्शवली जात आहे. गुरुच्या चंद्रावर पाणी असल्याची माहिती प्रथम नेचर ऍस्ट्रोनॉमी या जर्नलमध्ये प्रकाशित झाली.
अमेरिकेतील हवाई या शहरातील डब्ल्यू. एम. केक या वेधशाळेच्या मदतीने युरोपावरील पाण्याच्या बाष्पाचा अंदाज घेण्यात आला. युरोपा या उपग्रहावर पृष्ठभागावर हा बर्फ साचला असून कधीकधी फवाऱ्यांसारखं यातून पाणी बाहेर येते याचे पुरावे संशोधकांकडे असल्याची माहिती आहे. मात्र पाण्याचे मॉलेक्युल्स मोजले नसल्याने गुरुच्या चंद्रावर खरंच पाणी आहे का याची खात्री देणे शक्य होत नव्हते.
मात्र नुकत्याच नासाने केलेल्या संशोधनामुळे गुरुच्या आतील रचनेचा अभ्यास करणे आणखी सोपे होणार असल्याचे नासाने म्हटले आहे. जीवसृष्टीसाठी लागणारे आवश्यक घटक गुरुच्या चंद्रावर उपलब्ध असल्याची शक्यता नासाच्या संशोधकांनी वर्तवली आहे. त्यामुळे युरोपा हा नासाच्या संशोधकांसाठी जीवसृष्टीच्या आणि पर्यायाने पाण्याच्या संशोधनकार्यात महत्वाचा ग्रह ठरला आहे.
दरम्यान, पृथ्वी व्यतिरिक्त इतर ग्रहांवर जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी नासा प्रयत्नशील आहे. मात्र, अशी जीवसृष्टी अस्तित्वात येण्यासाठी तिथे पृथ्वीप्रमाणे पाणी असणे आवश्यक आहे. त्यामुळे असे पाण्याचे अस्तित्व शोधण्याच्या दृष्टीने वैज्ञानिकांचे प्रयत्न सुरु आहेत.