पुणे – यंदाच्या पुणे मॅरेथॉन स्पर्धेत इथियोपियाच्या खेळाडूंनी बाजी मारली. महिला विभागात देरार्टु केबेडे (२ तास ४७.०२ सेकंद) तर पुरुष विभागात लेटा गुटेटा (२ तास १७ मिनिटे २७ सेकंद) यांचा दबदबा पाहायला मिळाला. तसेच परभणीच्या ३५ वर्षीय ज्योतीने सलग तिसऱ्या वर्षी देखील पुणे मॅरेथॉनमध्ये भारतीय विभागात आपलं वर्चस्व कायम ठेवल्याचे दिसून आले. या मॅरेथॉन दरम्यान खेळाडूंना मोठ्या अडथळ्यांचा देखील सामना करावा लागला.
सारसबाग येथील सणस क्रीडांगणापासून रात्री १२ वाजता मॅरेथॉनला सरहद कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे संयोजक आणि जम्मू-काश्मीरचे माजी मंत्री फिरोज अहमद खान यांच्या हस्ते ४२ किलोमीटर अंतराच्या पूर्ण मॅरेथॉनला निशाण दाखविण्यात आले. या वेळी वंदना चव्हाण, प्रशांत जगताप, रमेश बागवे, सुनील कांबळे, अभय छाजेड, रोहन मोरे, गुरबन्स कौर, सुमंत वाईकर आदी उपस्थित होते.शर्यतीच्या सुरुवातीपासून इथियोपियाच्या धावपटूंनी एकत्र धावत वर्चस्व राखले होते.
भारतीय गटात महिला विभागात ज्योती गवते तर पुरुष विभागात कालिहास हिरवे विजेते ठरले. अर्ध मॅरेथॉन शर्यतीतही इथियोपिया यांनीच बाजी मारली. मात्र महिला विभागात पुण्यात सराव करणाऱ्या साताऱ्याच्या रेश्मा केवटेने (१ तास १९ मिनिटे ५४ सेकंद) विजेतेपद पटकावत इथियोपियाला धक्का दिला.
धावपटूंना करावा लागला त्रासाचा सामना
सिंहगड रस्त्याने नांदेड सिटीमधून परत सणस मैदान अशा दोन फेऱ्या धावपटूंना पूर्ण कराव्या लागल्या.
शर्यतीचा मार्ग सरळ असला, तरी सिंहगड रस्त्यावर सुरू असलेले पुलाचे काम आणि नांदेड सिटीच्या वळणावरील वाहतुकीमुळे खेळाडूंना चांगलाच त्रास झाला.
नांदेड सिटीमधील रहिवाशांनी आतमध्ये प्रवेश करण्यासाठी ताटकळत राहावे लागले.
धावपटूंच्या दुसऱ्या फेरीला मधूनच वाहतूक सोडण्यात आल्यामुळे धावपटूंना अनेक अडथळ्यांतून मार्ग काढावा लागला.
नांदेड सिटीमध्ये दिवे बंद करण्यात आल्यामुळे धावपटूंना अंधारातच मार्ग शोधावा लागला.