आयुक्तांच्या मान्यतेशिवाय निविदा रद्द
पुणे – महापालिका आयुक्तांच्या मान्यतेशिवाय परस्पर निविदा रद्द करून भल्या सकाळीच एस्टीमेट कमिटीची बैठक घेण्यात आल्याचा प्रकार उजेडात आणला गेला आहे. सकाळी 7 वाजता ही बैठक घेतली गेली. दरम्यान, बेकायदेशीरपणे राबविलेल्या निविदा प्रक्रियेची चौकशी करावी, अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे.
महापालिकेच्या वाहन विभागाच्या वतीने काही दिवसांपूर्वी वाहन चालकांच्या नियुक्तीसाठी निविदा काढली होती. मर्जीतील ठेकेदारालाच ही निविदा मिळावी यासाठी अटीशर्ती टाकण्यात आल्या.
सुरुवातीला 5 वर्षांसाठी या निविदा काढण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या वाहन विभागाने त्यानंतर मात्र दोन वर्षांसाठी निविदा काढली. मात्र, मर्जीतील ठेकेदार पात्र ठरत नसल्याने निविदा रद्द केली गेली.
तसेच, नव्याने निविदा काढण्याचा निर्णय संबंधित विभागाचे प्रमुख नितीन उदास यांनी घेतला.
वास्तविक पाहता निविदा रद्द करण्याच्या निर्णयावर महापालिका आयुक्तांची स्वाक्षरी असावी लागते. मात्र, उदास यांनी परस्परच निविदा रद्द करून गैरवर्तन केल्याचा आरोप कॉंग्रेस नगरसेवक अरविंद शिंदे यांनी केला आहे.