पुणे – ऑनलाईन शॉपींग करताना मोबाईलच्या बदल्यात साबणाची वडी येणे, प्रत्यक्ष खरेदी केलेल्या वस्तू ऐवजी दुसरी वस्तू येणे किंवा कमी दर्जाचे प्रोडक्ट येणे अशा फसवणूकीच्या घटना घडत असतात. मात्र पुण्यातील एका इस्टेट एजंटने चक्क ऑन लाईन पोर्टललाच सव्वा लाखाचा गंडा घातल्याची घटना घडली. तेही फ्लीपकार्टसारख्या नामांकित कंपनीला. याप्रकरणी इस्टेट एजंटला लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे.
कंपनीच्यावतीने किरण कांबळे (30,रा.विश्रांतवाडी) याने दिलेल्या फिर्यादीनूसार सुनिलकुमार निरंजणकुमार गुप्ता( 55, रा. हिंजवडी) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार सुनिलकुमारने फ्लिपकार्ट वेबसाईटवरुन ऑनलाईन पध्दतीने सोन्याच्या दागिण्यांची खरेदी केली होती. त्याची डिलेव्हरी डीलीव्हरी डॉटकॉम या लॉजिस्टीक कंपनीकडून त्यांना प्राप्त झाली. त्यानंतर त्याने खरेदी केलेल्या सोन्याच्या दागिण्याप्रमाणे बनावट दागिने तयार करुन घेतले.
ऑनलाईन पार्सलची ऑर्डर रद्द करुन बनावट सोन्याचे दागिने डिलिव्हरी बॉयकडे दिले. फ्लीपकार्ट कंपनीकडून 41 हजार 670 रुपये स्विकारले. ही रक्कम आणि स्वत:कडे ठेवलेले सोन्याचे दागिने अशी 1 लाख 22 हजार रुपयांची फसवणूक त्यांनी केली. दागिने बनावट असल्याची बाब लक्षात आल्यावर कंपनीच्यावतीने तक्रार देण्यात आली. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुहास पाटील करत आहेत.