पुणे : शहरातील आरोग्य तपासणीसाठी क्षेत्रीय कोविड केअर केंद्राची उभारणी करण्यात आल्याची माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. तसेच डेडिकेटेड कोवीड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटल सुरू करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले.
मुख्य सचिवांनी याबाबतीत व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये दिलेल्या सूचना आणि केंद्र सरकारच्या आरोग्य व स्वास्थ्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे.
पुणे शहरातील नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी क्षेत्रीय कोविड केअर केंद्राची उभारणी करीत असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितलं.
दरम्यान, पुण्यात आज कोरोनामुळे दोन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. शहरातील दोन कोरोनाबाधित महिलांचा मृत्यू झाला आहे. यातील एक महिला संगमवाडी परिसरातील ५८ वर्षीय आणि सोमवार पेठेतील ५६ वर्षीय महिलेचा यात समावेश आहे. दरम्यान, दोन्ही रुग्णांना कोरोनाशिवाय इतर आजारही होते अशी माहिती पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
तर, रविवारी सकाळी मालेगावमध्ये पाच जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यात भर म्हणून दुपारी १२ वाजता आणखी १३ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे मालेगावात दिवसभरात १८ नवे कोविड रूग्ण आढळले आहेत.आजच्या १८ नव्या रूग्णांमुळे मालेगावातील कोविड बाधितांची संख्या २७ झाली आहे. त्यापैकी मालेगावात एका कोविड बाधिताचा मृत्यू झाला आहे.