भारतीय वायू दलाकडून १ कोटी रुपयांची रक्कम देणगी
पुणे : भारतीय वायू दलाच्या सहकार्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘मार्शल ऑफ द एअर फोर्स अर्जन सिंग’ यांच्या नावाने अध्यासनाची स्थापना करण्यात येणार आहे. याबाबतचा सामंजस्य करारत येत्या २९ फेब्रुवारी रोजी विद्यापीठात होणार आहे. या अध्यासनाच्या स्थापनेसाठी वायू दलाच्या मुख्यालयाकडून १ कोटी रुपयांची रक्कम देणगी म्हणून दिली जाणार आहे. हे या प्रकारचे देशातील पहिलेच अध्यासन असेल.
अर्जन सिंग हे मार्शल ऑफ द एअर फोर्स (पंचतारांकित रँक) हे पद भूषविणारे एकमेव अधिकारी आहेत. त्यांनी १९६५ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धात अतिशय महत्वाची व निर्णायक भूमिका बजावली होती. त्यासाठी त्यांना भारत सरकारने पद्मविभूषण हा नागरी सन्मान बहाल केला होता. तसेच, १९६६ मध्ये एअर चीफ मार्शल या पदावर पदोन्नती देण्यात आली होती. त्यांच्या नावाने हे अध्यासन सुरू करण्यात येत आहे.
अर्जन सिंग अध्यासनाचा हेतू राष्ट्रीय सुरक्षा आणि सामरिक अभ्यासाशी संबंधीत मुद्दयांबाबत भारतीय वायुसेनेचे शैक्षणिक अधिकारी आणि सेवा अधिकारी यांच्यात परस्पर सहकार्य निर्माण करणे तसेच, दोन सहभागी संस्थामधील सहकार्य वाढविणे हा आहे. सुरक्षा आणि संरक्षणाशी संबंधीत शैक्षणिक समुदायातील ज्ञानाचे संयोजन आणि जमिनीवर व हवेवर अभ्यास करणारे व्यावसायिक यांना या विषयाचे नवीन आयाम मिळतील, अशी माहिती सामरिक व संरक्षणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे यांनी दिली.
या अध्यासनाच्या स्थापनेमागे पुढील उद्दिष्ट्ये आहेत-
अ) राष्ट्रीय सुरक्षा व संरक्षणविषयक बाबींमध्ये आणि विशेषतः या क्षेत्रातील सशस्त्र दलाच्या भूमिकेत नागरिकांचा रस निर्माण करणे.
ब) राष्ट्रीय सुरक्षा संबंधित समकालीन व भविष्यकालीन हितसंबंधाच्या सुरक्षाभिमुख विषयांवर संशोधन / अभ्यास करणे.
क) राष्ट्रीय सुरक्षा आणि जागतिक सुरक्षितता या विषयावर चर्चासत्रे, कार्यशाळा भरवणे आणि इतर सर्व कार्यक्रमांचे आयोजन करणे.
विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागात १९९५ मध्ये भूदलातर्फे ‘छत्रपती शिवाजी पॉलिसी चेअर’ ची स्थापना करण्यात आली आहे. भारतीय स्थलसेना व दक्षिण कमांड यांच्या समन्वयाने संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागात ‘छत्रपती शिवाजी पॉलिसी चेअर’ सोबतच रेसिडंट स्कॉलर कार्यक्रम घेण्यात येतो. त्याद्वारे विविध धोरणात्मक विषयांवर स्थलसेनेचे अधिकारी विभागाच्या समन्वयाने काम करीत आहेत. तशाच पद्धतीचा सामंजस्य करार आता अर्जन सिंग अध्यासनाच्या निमित्ताने भारतीय वायुसेनेसोबत होत आहे.
या सामंजस्य कराराकरीता हवाई दलाचे एअर मार्शल अमित देव, एअर व्हाईस मार्शल एल. एन. शर्मा, ग्रुप कॅप्टन शक्ती शर्मा, विंग कमांडर व्ही. के. बंधू, विंग कमांडर राहुल भसिन, एअर कमांडर एस. पी. भंडारे, स्कॉडर्न लीडर मधुमिता दत्त, स्कॉडर्न लीडर रिना, तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. नेहरू उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, विभागप्रमुख डॉ. विजय खरे, एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले व इतर मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.