राज्यातील सरकार स्थापनेचा संबंध सरसंघचालकांशी जोडू नये

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची अपेक्षा

नागपूर : राज्यातील सरकार स्थापनेबाबतच्या हालचालींचा संबंध सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी जोडण्यात येऊ नये, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. राज्यातील सरकार स्थापनेबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल. भाजपने शिवसेनेपेक्षा जास्त जागा जिंकल्या असल्यामुळे मुख्यमंत्री भाजपचाच असेल, असेही गडकरी म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची शक्‍यता त्यांनी स्पष्ट शब्दांमध्ये फेटाळून लावली. देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री होतील, असे ते म्हणाले.

एका अन्य प्रश्‍नाचे उत्तर देताना सरसंघचालक मोहन भागवत किंवा संघाचा संबंध सरकार स्थापण्याच्या हालचालींशी जोडणे योग्य होणार नाही, असेही गडकरींनी सांगितले.

सरकार स्थापण्याची कोंडी सोडवण्यासाठी सरसंघचालक मोहन भागवत यांनी गडकरी यांना नियुक्‍त करावे, अशी अपेक्षा विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेमध्ये दाखल झालेले शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी अलिकडेच व्यक्‍त केली होती. या घडामोडींबाबत संघाने मौन बाळगले असून त्याबाबत लोकांना चिंता वाटत असल्याचेही तिवारी म्हणाले होते.
जनतेने भाजप आणि शिवसेनेला नवीन सरकार स्थापण्यासाठी जनादेश दिला असून लवकरच याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असेही गडकरी म्हणाले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×