नवीन पॅटर्न राबविणार : 100 बेडची सुविधा
देहूगाव – तीर्थक्षेत्र देहू येथील भक्त निवासामध्ये करोना केअर सेंटरची उभारणी करण्यात आली. अंतिम टप्प्यातील कामाची पाहणी प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी रविवारी (दि. 19) केली. नवीन पॅटर्न राबवित करोनाबाधितांची साखळी तोडत गाव मुक्त करण्याचा संकल्प करीत प्रशासनाने नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे.
करोना महामारी संकटाने जगभरात थैमान घातले आहे. बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. देहूतील बाधित रुग्णांना रुग्णालयामध्ये जागा उपलब्ध होत नसल्याने जिल्हा प्रशासनाने दखल घेत येथील भक्त निवास येथे करोना केअर सेंटर उभारण्याचा निर्णय करीत गत आठवड्यात कामास प्रारंभ केला.
अंतिम टप्प्यातील कामाची पाहणी नुकतीच प्रांताधिकारी सचिन बारवकर, अप्पर तहसीलदार गीता गायकवाड यांनी केली. गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, वैद्यकीय अधिकारी किशोर यादव, तलाठी अतुल गीते, ग्रामसेवक दयानंद कोळी, अर्जुन गुडसूरकर, पंचायत समिती सदस्या हेमलता काळोखे, सरपंच पूनम काळोखे, उपसरपंच स्वप्नील काळोखे, पोलीस उपनिरीक्षक किरण कणसे, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, स्वयंसेवक आदी यावेळी उपस्थित होते.
केअर सेंटरमध्ये 100 बेडचे सुविधा करण्यात आली असून, लक्षणे नसणारे मात्र पॉझिटिव्ह असणाऱ्या बाधितांना राहण्याची, नाश्ता, जेवण गरम पाणी, मनोरंजनासाठी एलईडी आदी विविध सुविधासह संपर्कात आलेल्याची स्वॅब तपासणी, औषधोपचार, डॉक्टर, परिचारिका, पोलीस, सी. सी. कॅमेऱ्यांची तयारी करण्यात आली आहे.
देहूत नवीन पॅटर्न राबवून 10 दिवसांत करोनामुक्त गाव करण्याचा संकल्प करीत नागरिकांना प्रतिसाद आणि सहकार्य करण्याचा आवाहन प्रांताधिकारी यांनी यावेळी केले. वार्डनिहाय सदस्यांनी नागरिकांची तपासणी करून घेणे, प्रत्येक व्यापाऱ्यांनी स्वतःची व दुकानात असलेल्या कर्मचाऱ्यांची तसेच
भाजीपाला विक्रेते आणि लघू व्यावसायिकांनी स्लॅब तपासणी करावी. अशा दुकानांमध्ये ग्राहकांनी खरेदी करावेत. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केल्यास देहू करोनाची साखळी तोडून
करोनामुक्त करण्यास वेळ लागणार नाही.
– सचिन बारवकर, प्रांत अधिकारी.