मतदान केंद्रांवर अत्यावश्‍यक सेवा-सुविधांचा दुष्काळ

नियोजन केवळ कागदोपत्रीच : उन्हाच्या झळांमुळे मतदारांची होरपळ
प्रशासनाचा दावा ठरला फोल; पाण्याविना, नाष्ट्याविनाच कर्मचारी

घरून आणला कूलर

मतदार केंद्र खोलीत पंख्याची व्यवस्था नसल्याने नगर शहरातील एक सखी मतदार केंद्रातील मतदार अधिकाऱ्यांसह कर्मचारी उकाड्याने त्रस्त झाले होते. सकाळी साडेपाच वाजल्यापासून आल्यानंतर चहा व नाष्टा तर आला नाही. पण या उकाड्याने हैराण झालेल्या या महिलांनी अखेर घरातील व्यक्‍तींच्या मार्फत या मतदार केंद्रावर कुलर मागवून घेतला.

नगर – लोकशाहीच्या उत्सवात अधिकाधिक मतदारांनी सहभागी व्हावे, यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर अत्यावश्‍यक सुविधांमध्ये वाढ करण्यात आली आहे, असा गवगवा जिल्हा निवडणूक विभागाच्यावतीने करण्यात आला. परंतु, प्रत्यक्ष बहुतांशी मतदान केंद्रांवर अत्यावश्‍यक सुविधांचा दुष्काळ होता. परिणामी, नागरिकांची उन्हामुळे होरपळ शिवाय पाण्याविना घशालाही कोरड पडलेली होती.

लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर मेडिकल किट, मतदान केंद्रावर सावलीची व्यवस्था, दिव्यांग तसेच गर्भवती महिला मतदारांसाठी स्वयंसेवकांची मदत, लहान मुलांसाठी पाळणाघर, अंध आणि दिव्यांग मतदारांसाठी वाहतुकीची व्यवस्था, रॅम्पची व्यवस्था, पिण्याचे पाणी, विजेची उपलब्धता, स्वच्छतागृहांची सुविधा या अत्यावश्‍यक सुविधा उपलब्ध करून द्याव्या, अशा सूचना निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्या होत्या.

या सूचनेनुसार वाढत्या तापमानाची दखल घेताना मतदान केंद्रावर महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार आणि महिलांसोबत असलेल्या लहान मुलांचा उन्हापासून बचाव करण्याकरीता सावलीसाठी मंडप टाकण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. परंतु, बहुतांश मतदान केंद्रावर यातील सुविधाच उपलब्ध झाल्या नसल्याचे दिसून आले. काही मतदान केंद्रावर लहान मंडप टाकण्यात आला. यामुळे मतदारांना उन्हाचे चटके सहन करीतच मतदान करावे लागले. मतदान केंद्रावर उन्हाची तीव्रता लक्षात घेता थंड पाण्याची व्यवस्था करणे आवश्‍यक होते. परंतु, पाण्याचीही व्यवस्था मतदान केंद्रावर नव्हती.

पाळणाघर व वैद्यकीय सहाय्यकांचा तर पत्ताच नव्हता. यामुळे प्रशासनाने केवळ कागदोपत्रीच सेवा व सुविधांची व्यवस्था केल्याचे निदर्शनास आले. सुविधा नसल्याने मतदारांनाही याचा नाहक त्रास झाला.मतदान केंद्रांवर विजेची व्यवस्था आहे तर पंख्यांची व्यवस्था नाही. त्यामुळे मतदार केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह मतदार उकाडा सहन करावा लागला. काही मतदार केंद्रांवर कमी उजेडाचे दिवे बसविण्यात आल्याने मतदार केंद्रांत प्रकाश अंधुक होता. ईव्हीएम मशीन गरम होत असल्याने मतदार केंद्र खोली देखील गरम होत होती. त्या उन्हाचा कहर यावेळी मतदार अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना या खोलीचा चांगलाच उकाडा सहन करावा लागला. दुपारी साडेबारापर्यंत नगर शहरातील बहुतांशी मतदार केंद्रावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना नाष्टा देण्यात आलेला नव्हता. पिण्याची पाणी देखील उपलब्ध झाले नव्हते. काही ठिकाणी पाण्याचे जार होते. मात्र त्यामध्ये असलेली पाणी कोमड होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.