पिंपरी, (प्रतिनिधी) – चिंचवड येथील राज्य कामगार विमा योजना (ईएसआय) रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन गेल्या दहा वर्षांपासून रेडीओलॉजीसिस्टशिवाय धूळखात पडले आहे. सोनोग्राफी कक्षच चक्क सील करण्यात आला आहे.
परिणामी, महिला कर्मचारी गर्भवतींना सोनोग्राफी करण्यासाठी वायसीएम येथे जावे लागते. त्यांना सोनोग्राफीसाठी अपॉइंटमेंट मिळत असल्याने कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, या दहा वर्षांत एकही सोनोग्राफी करण्यात आली नसल्याची माहिती उघडकीस आली आहे.
शहरातील ईएसआय रुग्णालयात चाकण, तळेगाव, बारामती, जुन्नर, लोणावळा, हिंजवडी या भागातील कामगार मोठ्या प्रमाणात उपचारांसाठी येतात. कर्मचारी विमा योजना अंतर्गत अनेक कामगार याचा लाभ घेतात. प्रत्येक कामगारांच्या वेतनातून ईएसआय कपात केली जाते. परंतु त्या बदल्यात या कामगारांना उपचार दिले जात नाहीत. दर दिवसाला पाचशे कामगार उपचारासाठी येतात.
परंतु ईएसआय रुग्णालयात कामगारांसाठी कोणतीच मूलभूत सुविधा नाही. या ठिकाणी कमीत कमी तीनशे खाटा तरी पाहिजेत आणि सर्व अत्याधुनिक तपासणी यंत्रसामग्री गरजेची आहे. लघु उद्योगांतर्फे ईएसआयला मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो.
काही कंपन्यांकडून लाखो रुपयांचा फंड हा पीएसआय विभागाला जातो. परंतु ईएसआय रुग्णालयामध्ये अत्याधुनिक सुविधा नसल्यामुळे कामगारांना सरकारी रुग्णालयांमध्ये पाठवितात.
या ससून रुग्णालय, यशवंतराव चव्हाण मेमोरिअल (वायसीएम) या रुग्णालयांकडे उपचारांसाठी पाठविले जात आहेत. या कामगारांना सोनोग्राफीसाठी दीड महिन्याची अपॉईंटमेंट दिली जात आहे.
गर्भवती महिलांना सोनोग्राफीसाठी वायसीएम जावे लागत आहे. यामध्ये वेळ व पैसाही खर्च होत आहे. यातील अनेक महिला आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील असल्याने खासगी वाहनाने जाणे त्यांना अवघड होत आहे.
या रुग्णालयात शस्त्रक्रिया करून बाळंतपणेही होत नाही. रुग्णालयात सोनोग्राफी मशिन आहे, पण सोनोग्राफी तज्ज्ञ उपलब्ध नसल्याने एकही सोनोग्राफी करण्यात आली नसल्याने त्यांना फार मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
कामगार विमा योजने अंतर्गत लाभार्थी कामगारांना खासगी रुग्णालयात अतिविशिष्ट किंवा ज्या सोयी आमच्याकडे नाहीत.
दहा वर्षापासून रेडियोलॉजिस्ट आमच्याकडे नाहीत. आम्ही वारंवार सरकारकडे मागणी केली आहे. परंतु रेडियोलॉजिस्ट उपलब्ध होत नाहीत.- डॉ. वर्षा सुपे, वैद्यकीय अधीक्षक, ईएसआय रुग्णालय, मोहननगर