नवी दिल्ली – अवैध ऑनलाईन गेमिंगशी संबंधित 357 संकेतस्थळं वस्तू आणि सेवा कर गुप्तचर विभागानं बंद केली असून 2400 बँक खातीही गोठवल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. या गेमचा वापर करणारे अनेक चित्रपट कलाकार, क्रिकेटपटू आणि समाज माध्यमांच्या प्रभावाखाली न येता नागरिकांनी दक्षता बाळगावी असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे.
परदेशातून चालवल्या जाणार्या ऑनलाईन गेमिंग कंपन्या नोंदणी न करता चालवल्या जात असून यामुळे वस्तू आणि सेवा कराचा भरणा केला जात नसल्यानं वस्तू आणि सेवा कर महासंचालनालयानं सुमारे 700 कंपन्यांच्या व्यवहारांवर लक्ष ठेवलं आहे.
आपले व्यवहार सुलभरित्या करण्यासाठी या कंपन्यांनी सुरु केलेली बनावट बँक खाती गोठवण्यात आली आहेत. आय पी एल क्रिकेट हंगामाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी केवळ नोंदणीकृत ऑनलाईन मंचाचा वापर करावा असं आवाहन अर्थ मंत्रालयानं केले आहे.