बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील प्रकार
मार्केट यार्ड – प्लॅस्टिक पिशव्यांना बंदी असताना त्याचा सर्रासपणे वापर होत आहे. गुलटेकडी मार्केट यार्ड भागातील शिवनेरी रस्त्यावर 17 जानेवारीला प्लॅस्टिक कारवाई झाली. या कारवाईतील माल आणि संबंधित विक्रेत्याला क्षेत्रीय कार्यालयात नेल्यात आले. नागरिकांनी संबंधित पातळ प्लॅस्टिक पिशव्या विक्रेत्याला पकडून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले, असा प्रकार दोन वेळा झाला. मात्र, संबंधित व्यापारी तेथून पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचे नागरिकांना सांगितले.
दरम्यान, तब्बल 40 किलो प्लॅस्टिक पर्यावरणप्रेमी भरत सुराणा यांनीही पकडून दिले होते. ते जप्त करण्यात आले; परंतु क्षेत्रीय कार्यालयाजवळ सुरक्षारक्षक असताना प्लॅस्टिक विक्रेत्याने पलायन केले, विक्रेता पळाला कसा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सिसिटीव्ही फुटेज तपासण्याची आणि संबंधित विक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी भरत सुराणा यांनी पालिका घनकचरा आयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांना केली आहे.
सदर प्रकरणाला दहा दिवस होऊन गेले असून अजून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. नागरिकांनी दोनदा सदर विक्रेत्याला पकडून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे दिले. दोन्ही वेळा विक्रेता पळून गेल्याची रतसर तक्रार दाखल का केली नाही. विक्रेता आणि अधिकारी यांचे संगनमत असल्याचा संशय येत आहे.
– भरत सुराणा, सामाजिक कार्यकर्ते
संबंधित प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश क्षेत्रीय कार्यालयाला देण्यात आले आहेत. संबंधीत विक्रेता सुटला की पळून गेला. याबद्दल नक्की माहिती नसून चौकशी करीत आहोत.
– ज्ञानेश्वर मोळक, घनकचरा विभाग, पुणे महानगरपालिका