स्टेट बॅंकेचे येस बॅंकेला मदतीसाठी प्रयत्न
नवी दिल्ली : येस बॅंक भांडवलाच्या तुटवड्यामुळे अडचणीत आली आहे. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने आपला नियंत्रक या बॅंकेवर ठेवला आहे. या बॅंकेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न चालू आहेत. येस बॅंकेचा प्रश्न फक्त येस बॅंकेचा आहे. त्याचा परिणाम इतर बॅंकावर होणार नाही असा दावा स्टेट बॅंकेने केला आहे.
स्टेट बॅंक येस बॅंकेचे 49 टक्के भागभांडवल खरेदी करण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठीचा तपशीलातील आराखडा स्टेट बॅंक सोमवारी सायंकाळपर्यंत रिझर्व बॅंकेला सादर करणार आहे.
यासाठी बॅंक 10,000 कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक करू शकते असे स्टेट बॅंकेचे अध्यक्ष रजनिष कुमार यांनी म्हटले आहे. या प्रस्तावाला स्टेट बॅंकेच्या संचालक मंडळाने गुरुवारी मंजुरी दिली आहे. त्यानंतर हा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठवला होता. अर्थ मंत्रालयानेही या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखविला आहे.
आज स्टेट बॅंकेचे अध्यक्ष रजनिष कुमार यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. आम्ही येस बॅंकेला पुन्हा स्वतःच्या पायावर ठामपणे उभे करू शकू. त्यासंदर्भातील आराखडा आमच्याकडे तयार आहे. हा प्रश्न संपूर्ण बॅंकिंग व्यवस्थेचा नाही.
हा फक्त येस बॅंकेचा प्रश्न आहे आणि तो तेवढाच मर्यादित राहील. त्यामुळे याचा परिणाम सर्व बॅंकिंग क्षेत्रावर होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे ते म्हणाले.
दरम्यान रजनीश कुमार यांनी येस बॅंकेचा इतर बॅंकावर परिणाम होणार नाही असे म्हटले असले तरी येस बॅंकेचे हजारो ठेवीदार यामुळे हवालदिल झाले आहेत.
त्याचबरोबर येस बॅंकेच्या विविध उत्पादनामध्ये गुंतवणूक केलेल्या म्युच्युअल फंड उद्योगालाही याचा 10 हजार कोटी रुपयांचा फटका बसू शकतो असे बोलले जाऊ लागले आहे.
रिझर्व बॅंकेने शुक्रवारी येस बॅंक वाचविण्यासाठी ज्या उपाययोजना जाहीर केल्या त्या उपाययोजना जर काही महिन्यांपूर्वी जाहीर झाले असत्या तर जास्त हानी झाली नसती असे समजले जाऊ लागले आहे. त्यामुळे अर्थ मंत्रालयावरही टीका होत आहे.