कामात बदल करून ‘स्वच्छ’ने त्रुटी दूर कराव्यात – बीडकर

स्वच्छच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली सभागृह नेते गणेश बीडकर यांची भेट

पुणे (प्रतिनिधी) – घरोघरी जाऊन कचरा गोळा करणाऱ्या स्वच्छ संस्थेचे काम बंद करून दुसऱ्या संस्थेला हे काम देण्याचा आमचा हट्ट नाही. मात्र यापुढील काळात स्वच्छ संस्थेने आपल्या कामाच्या पद्धतीत बदल करून त्रुटी दूर करणे गरजेचे आहे, असे पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेता गणेश बीडकर यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

शहरातील विविध भागात दारोदारी जाऊन कचरा गोळा करणाऱ्या  स्वच्छ या संस्थेबरोबर पालिका प्रशासनाने केलेला करार डिसेंबर २०२० रोजी संपला आहे. हा करार वाढविण्यास काही महिन्यांची मुदतवाढ देताना संस्थेचे काम समाधानकारक नसल्यास निविदा प्रक्रिया राबवून नवीन संस्थेला हे काम देण्याचा ठराव नुकताच स्थायी समितीच्या बैठकीत झाला आहे.

कचरा गोळा करणा-या स्वच्छ संस्थेच्या कामाबद्दल काही लोकप्रतिनिधींनी पालिका प्रशासनाकडे तक्रारी केलेल्या आहेत. त्यामुळे या संस्थेचे काम काढून दुसऱ्या संस्थेला देण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोरदार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर संस्थेच्या पदाधिकारी, कर्मचारी यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी सभागृह नेते बीडकर यांची भेट घेतली.

स्वच्छ संस्थेच्या कामाबद्दल नागरिकांमध्ये समाधान असून सहा लाख नागरिकांच्या सह्यांचे निवेदन संस्थेच्या वतीने बीडकर यांना देण्यात आले. स्वच्छ संस्थेचे काम चांगलेच असून काही सभासदांच्या तक्रारी आल्याने प्रशासनाच्या पातळीवर ही चर्चा सुरू आहे. त्याचा अभ्यास सुरू असून सर्व गोष्टींचा अभ्यास, विचार करून त्यानंतरचा याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

संस्थेचे काम चांगले असून काही त्रुटी आहेत. त्यावर चर्चा करून उपाय योजना करणे गरजेचे आहे, यासाठी संस्थेने देखील आपल्या कामाच्या पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा सभागृह नेते गणेश बीडकर यांनी व्यक्त केली.

स्वच्छ संस्थेच्या कामाबद्दल काही भागातील नागरिकांच्या तसेच सभासदांच्या तक्रारी आहेत. नगरसेवक, स्वच्छचे पदाधिकारी, प्रशासनातील अधिकारी यांची एकत्रित बैठक घेतली जाईल. यामध्ये चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल.
– गणेश बीडकर, सभागृह नेता, पुणे महापालिका

शहरातील सहा लाख मिळकतधारकांनी स्वच्छ संस्थेचे काम चांगले असल्याची स्वाक्षरी आणि अभिप्राय दिला आहे. तसेच विविध भागातील ११० नगरसेवकांनी स्वच्छ कामाबद्दल समाधान व्यक्त करत आपला पाठिंबा दिल्याचा दावा यावेळी स्वच्छच्या पदाधिका-यांनी केला. स्वच्छ संस्थेचे काम अतिशय चांगले असून गेल्या अनेक वर्षापासून संस्थेचे कर्मचारी, कचरावेचक घरोघरी जाऊन नागरिकांना सेवा देत आहे.

करोनाच्या काळातही आपल्या जीवाची कोणतीही पर्वा न करता संस्थेच्या कर्मचा-यांनी पुणेकरांचा कचरा उचलत आपले कर्तव्य पार पाडले. संस्थेचे काम काढून इतर खासगी संस्थेला दिले जाऊ नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत प्रशासनातील अधिकारी, नगरसेवक, संस्थेचे पदाधिकारी यांच्यासह पालिकेतील पदाधिकारी आणि घनकचरा विभागाचे प्रमुख यांच्याबरोबर बैठक घेत आवश्यक तो तोडगा काढण्याचे आश्वासन सभागृह नेता गणेश बीडकर यांनी दिले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.