बारा गुणांसाठीच्या 2 प्रश्नांच्या आकृत्याच दिल्या नाहीत
विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही ः तंत्रशिक्षण मंडळाचा दावा
पुणे – तंत्रनिकेतनच्या स्थापत्य अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाच्या “बिल्डिंग प्लॅनिंग अँड ड्रॉईंग’ या प्रश्नपत्रिकेत चुका असल्याचे आढळून आले आहे. एकूण 70 गुणांच्या या प्रश्नपत्रिकेत प्रत्येकी बारा गुणांसाठीचे दोन प्रश्न चुकल्याने 24 गुणांना मुकावे लागणार असल्याची भीती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे नव्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेचे हे पहिलेच वर्ष आहे. राज्यभरातील सुमारे 25 हजार विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. त्यात स्थापत्य अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाच्या (चौथे सत्र) “बिल्डिंग प्लॅनिंग अँड ड्रॉईंग’ या विषयाच्या सोमवारी झालेल्या परीक्षेत प्रश्न क्रमांक तीन आणि सहा यात चुका झाल्याचे निदर्शनास आले.
हे प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक असलेल्या आकृत्याच प्रश्नपत्रिकेत दिलेल्या नसल्याने हे प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवता आले नाहीत. प्रश्न अर्धवट असल्याचे विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर संबंधित चुकांबाबत तंत्रशिक्षण मंडळालाही कळवण्यात आले.
दरम्यान, प्रश्नपत्रिकेतील चुकांची माहिती मिळाली आहे. या चुका का झाल्या, याची तपासणी केली जाईल. मात्र, कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नसल्याचे राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले. दरम्यान, यामुळे मात्र विद्यार्थी गोंधळात अडकले आहेत.