पुणे – गणेश विसर्जनासाठी महापालिका प्रशासनाकडून सर्व प्रभागांमध्ये मिळून सुमारे 100 फिरत्या विसर्जन हौदांची व्यवस्था, 191 मूर्ती संकलन केंद्र, आदींसह घरोघरी जाऊन निर्माल्य संकलन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय अमोनियम बायकार्बोनेट मोफत पुरवण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
महापालिकेने निर्माल्य कलशाची व्यवस्था केली आहे. मात्र नागरिकांना मूर्तींचे विसर्जन घरच्या घरीच करण्याचे आवाहन केल्याने पालिकेचे कर्मचारी आणि स्वच्छ संस्थेचे कर्मचारी घरोघरी आणि सोसायट्यांमध्ये जाऊन निर्माल्य संकलन करणार आहेत.
उत्सवाच्या शेवटच्या टप्प्यात भाविकांनी रस्त्यावर गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. दीड दिवसांसह पाचव्या आणि सातव्या दिवशी नदीपात्र, घाटांवरही काही जणांनी विसर्जन केल्याच्या तक्रारी आहे. यानिमित्ताने अनंत चतुर्थीला अशा घटना घडणार नाहीत आणि लोक रस्त्यावर येणार नाहीत, याचे नियोजन महापालिकेने केले आहे. नदीपात्र, घाट आणि हौद असलेल्या ठिकाणी लाकडी बांबू उभारून रस्ते बंद केले आहेत. ते काम पूर्ण झाले आहे, असेही महापौर मोहोळ यांनी स्पष्ट केले.
करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने आणि गणेश मूर्तीचे विसर्जन घरच्या घरीच करण्याचे आवाहन पुणेकरांना यापूर्वीच केले आहे. या आवाहनाला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. मात्र, उत्सवातील सर्वांत महत्त्वाच्या टप्पा म्हणजे दहाव्या दिवशीच्या विसर्जनाचा आहे. प्रत्येकाने सुरक्षेला प्राधान्य देऊन घरच्या घरीच बाप्पांचे विसर्जन करावे.
– मुरलीधर मोहोळ, महापौर