ठोसेघर धबधबा प्रशासन पर्यटकांसाठी सज्ज 

परिसरातील स्वच्छतेसह रंगरंगोटी, डागडुजी पूर्ण

मद्यप्राशन करून येणाऱ्यास प्रवेश नाही

धबधबा पाहण्यासाठी काही हौशी पर्यटक मद्यप्राशन करून येऊन विनाकारण गदारोळ, गोंधळ घालतात असा अनुभव आहे. त्यामुळे शांतता भंग होण्याबरोबरच सामाजिक वातावरण दूषित होते. धबधबा परिसरात तैनात केलेल्या सुरक्षारक्षकांशी वादावादी करणे, हुज्जत घालणे असे प्रकार त्यांच्याकडून होतात. हे प्रकार थांबविण्यासाठी मद्यप्राशन करून येणाऱ्यास प्रवेश न देण्याचा निर्णय समितीने घेतला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

सातारा – पर्यटकांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठोसेघर, ता. सातारा येथील संयुक्त वन व्यवस्थापन समिती पावसाळा पर्यटनासाठी सज्ज झाली आहे. धबधबा परिसरातील स्वच्छतेसह रंगरंगोटी, डागडुजी पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष शंकरआप्पा चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना दिली. शंकरआप्पा चव्हाण म्हणाले, ठोसेघर येथील धबधबा व परिसर विकसित करण्यासाठी संयुक्त वन व्यवस्थापन समितीची स्थापना झाल्यानंतर समितीने याठिकाणी पर्यटकांना विविध सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला.

धबधबा परिसरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मुख्य धबधबा पाहण्यासाठी प्रेक्षक गॅलरीची उभारणी करण्यासह परिसरात संरक्षित रेलिंग करण्यात आले आहे. पेव्हर ब्लॉकचे रस्ते, आवश्‍यक तिथे पुलाची उभारणी, पर्यटकांना बसण्यासाठी बाकडे, पिण्यासाठी स्वच्छ पाणी आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. संयुक्त वन व्यवस्थापन समिती अस्तित्वात आल्यानंतर ठोसेघर धबधबा परिसरात एकही अपघाताची घटना घडली नाही. गेल्या काही महिन्यांपासून ठोसेघर येथील छोटा धबधब्याच्या जवळ असणारी गुफा विकसित करण्यात आली आहे. ही गुफा पाहण्यास जाण्यासाठी पायऱ्यांची डागडुजी करण्यात आली असून एका बाजूला सुरक्षेसाठी रेलिंग बसवण्यात आले आहे. छोट्या धबधब्याच्या गुहेच्या बाजूला सुरक्षेच्या कारणास्तव जाळी बसवण्यात आली असल्याने पर्यटकांना धबधबा पाहण्याचा आनंद अगदी जवळून लुटता येणार आहे.

पावसाळ्यामध्ये न्याहरी घेऊन येणाऱ्या पर्यटकांसाठी त्यांना न्याहरी खाता यावी यासाठी न्याहारी केंद्र उभारण्यात आले असून या केंद्रामध्ये साधारण 70 ते 80 पर्यटक एकाच वेळी आपल्यासोबत आणलेला डबा खाऊ शकतील. ठोसेघर हा डोंगरी भाग असल्याने या परिसरात पाऊस मोठ्या प्रमाणावर पडतो. परिणामी वाहने घसरून अपघातांची शक्‍यता नाकारता येत नाही. या संभाव्य बाबी लक्षात घेऊन लवकरच ठोसेघर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसमवेत समिती बैठक घेणार असून त्यामध्ये पावसाळ्याच्या दिवसांमध्ये 24 तास सेवा उपलब्ध करून देण्याची सूचना करण्यात येणार आहे. परळी प्राथमिक आरोग्य केंद्रात असणाऱ्या 108 क्रमांकाची रुग्णवाहिका सज्ज ठेवा, अशी मागणी देखील करण्यात येणार आहे, अशी माहिती चव्हाण यांनी यावेळी बोलताना दिली.

पावसाळ्याच्या दिवसांत धबधब्याकडे जाणाऱ्या पार्किंगनजिक वडापाव, भजी, मक्‍याची कणसे, चहाचा गाडा, भुर्जी पाव यांचे गाडे लावण्यात येतात. गतवर्षी साताऱ्यातून काही विक्रेते ठोसेघर येथे येऊन व्यवसाय करत होते. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय होत होता. यावर्षीपासून ठोसेघर येथीलच तरुण याठिकाणी आपले व्यवसाय करतील. बाहेरून येणाऱ्या एकाही व्यावसायिकाला याठिकाणी व्यवसायासाठी बसू दिले जाणार नाही, तसा निर्णय गावाने घेतला आहे, याची नोंद बाहेरून येणाऱ्या विक्रेत्यांनी घ्यावी.

प्रवीण चव्हाण, अध्यक्ष, बाबाराजे युवा ग्रुप.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.