पुणे – शहरातील चोवीस तास समान पाणीपुरवठा योजनेची अंमलबजावणी सुरू केल्यानंतर महापालिकेने नव्याने समाविष्ट झालेल्या 11 गावांमध्ये आणि यापुढे समाविष्ट होणाऱ्या 23 अशा 34 गावांमध्येही भविष्यात या योजनेच्या अंमलबजावणी करण्याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव तयार करणे पाणीपुरवठा विभागाने सुरू केले आहे.
यामध्ये प्रकल्पाचे डिझाइन, देखरेख आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांचा समावेश आहे. 11 गावांमध्ये लोहगाव, शिवणे, मुंढवा, हडपसर, साडेसतरा नळी, आंबेगाव (खुर्द), उंड्री, धायरी, आंबेगाव (बुद्रुक), उरुळी देवाची, फुरसुंगी या गावांचा समावेश करण्यात आला आहे. आणखी 23 गावे समाविष्ट होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. “वास्तविक ही योजना राबवण्यासाठी सल्लागार नको आहे तर या समाविष्ट गावांमध्ये भविष्यात या योजनेची अंमलबजावणी कशी करत येईल, रसेच पाणीपुरवठ्याच्या नेटवर्क आणि वितरण प्रणालीविषयी माहिती होण्यासाठी हा डीपीआर करायचा आहे. त्यातूनच ही सविस्तर माहिती मिळू शकेल,’ असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.
समाविष्ट 11 गावांमध्ये पाणीपुरवठा आणि वितरण करण्याचे योग्य नेटवर्क नाही. तसेच या गावांमध्ये यासाठी आवश्यक पायभूत सुविधा विकसित करण्यासाठी हे सल्लागार अभ्यास करतील आणि सविस्तर अहवाल देतील. याशिवाय भविष्यात उर्वरीत 23 गावे समाविष्ट होणार आहेतच, त्यामुळे याच डीपीआरमध्ये त्या गावांच्या पाणीपुरवठा नियोजनाचाही अहवाल मागवण्याचा विचार केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.