बेंगळुरू – राष्ट्रीय स्तरावर सर्व खेळाडूंना समान संधी व नवोदितांना सातत्याने सहभागी करून घेत देण्यात येत असलेले प्रोत्साहनच येत्या काळात भारताच्या महिला हॉकी संघाला गतवैभव मिळवून देईल, असा विश्वास भारताच्या महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल हिने व्यक्त केला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून भारतीय हॉकी महासंघाने सातत्याने या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष दिल्यानेच संघाची कामगिरी उंचावली आहे. जागतिक स्तरावर भारताच्या हॉकी संघाची खूप पीछेहाट झाली होती. आता त्यातून बाहेर येत सरस कामगिरीसाठी प्रत्येक खेळाडू सज्ज आहे.
गेल्या दोन वर्षांत मोठ्या स्पर्धांमध्ये जरी अपयश आले असले तरी त्यात सातत्याने सहभाग घेण्याची संधी मिळाल्याने खेळाडूंना मोठा अनुभव मिळाला आहे. हाच अनुभव आता येत्या काळात निर्णायक ठरेल, असेही तिने सांगितले.
करोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून सर्व खेळाडू घरातच अडकून पडले होते. अर्थात, हा काळ त्यांच्यासाठी निराशाजनक असला तरीही त्यामुळे महत्त्वाची विश्रांती मिळाली हे चांगले ठरणार आहे. आता जेव्हा स्पर्धा सुरू होतील तेव्हा खेळाडूंना सातत्याने सामने खेळावे लागणार आहेत. त्यामुळे आता मिळालेली विश्रांती त्यांच्यासाठी व संघासाठी लाभदायकच ठरेल, असेही तिने सांगितले.
टोकियो ऑलिम्पिकसाठी विविध स्पर्धा तसेच सरावसत्र लवकरच सुरू होणार असल्याने खेळाडू सरस कामगिरीसाठी अशावादी असल्याचेही तिने सांगितले.