लंडन –करोनाचा धोका कमी झाल्यावर मैदान रिकामे ठेवून इंग्लिश प्रीमिअर लीगला पुन्हा एकदा सुरुवात झाली. बलाढ्य क्लब अशी ओळख असलेल्या मॅंचेस्टर युनायटेडला ब्रुनो फर्नांडिसने केलेल्या महत्त्वपूर्ण गोलमुळे टॉटनहॅमशी बरोबरी साधता आली. अर्थात, या बरोबरीनंतरही मॅंचेस्टरने आगेकूच कायम राखली आहे.
स्टिव्हन बर्गविनने पहिल्या हाफमध्येच गोल करत टॉटनहॅमवर दडपण टाकले. हा गोल मॅंचेस्टरला चांगलाच झोंबला. मात्र, त्यानंतर त्यांनी अचानक गिअर बदलला व आक्रमक खेळ सुरू केला. दुखापतीतून जवळपास 10 महिन्यांनी पूर्ण तंदुरुस्त होऊन संघात परतलेल्या पॉल पोग्बा याने अत्यंत नियोजनबद्ध पुनरागमन करत सुरेख पास केला. या पासला रोखले गेले तरीही मॅंचेस्टरला पेनल्टी मिळाली. याचा पुरेपूर लाभ घेत ब्रुनो फर्नांडिसने अप्रतिम गोल करत संघाला या सामन्यात बरोबरी मिळवून दिली. फर्नांडिसने दुसऱ्या हाफमध्ये 63 व्या मिनिटाला गोल केला व संघाचे स्पर्धेतील आव्हान कायम राखले.
करोनाचा धोका वाढू लागल्याने या स्पर्धेलाही फटका बसलेला होता. करोनाचा धोका पाहता प्रेक्षकांना सामने पाहण्यासाठी मैदानात उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे रिकाम्या मैदानावर हा सामना खेळवण्यात आला.