सहा कोटी कर्मचाऱ्यांना फटका बसणार; कर्मचारी वर्गात नाराजीची लाट
नवी दिल्ली : भविष्य निर्वाह निधीच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने व्याज दर अवघा 8.5 टक्क्यांवर आणला आहे. पाच वर्षात हा सर्वात निचांकी व्याज दर आहे. त्याचा फटका देशातील सुमारे सहा कोटी कर्मचाऱ्यांना बसणार आहे, कामगार मंत्री संतोष गंगवार यांच्या हवाल्याने पीटीआयने हे वृत्त दिले आहे. 2018 -19मध्ये भविष्य निर्वाह निधीवर 8.65 टक्के व्याज दर होता.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने कर्मचारी भविष्य निधीवरील व्याज दर सरकारच्या अन्य गुंतवणूक योजनांएवढा करण्यासाठी कामगार मंत्रालयाला भाग पाडले असल्याचे मानण्यात येत आहे. आर्थिक वर्षात इपीएफवरील व्याजदर काय असावा याबाबत अर्थ मंत्रालय आणि श्रम मंत्रालयात एकमत व्हावे लागते. मात्र व्याज दरामुळे अर्थव्यवस्थेवर येणारा ताण पाहता व्याज दर कमी करण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांत असंतोषाची भावना व्यक्त होत आहे. भविष्य निर्वाह दरातील व्याज दर वाढवावा. कष्टकऱ्यांचा म्हातारपणाचा घास हिरावून घेऊ नये, अशी भावना व्यक्त होत आहे.