“रूफ टॉप गार्डन’मुळे पर्यावरणीय संजीवनी

पर्यावरणतज्ज्ञांचे मत : गच्चीवरही करता येते वृक्षारोपण

पुणे –
“इमारतीच्या टेरेसवर लावल्या जाणाऱ्या भाजीपाला, छोटी झुडपे, वेली यांच्या माध्यमातून जैवविविधता संवर्धनाला मोठा हातभार लागतो. हिरवाई जपण्याबरोबरच पर्यावरणीय समस्यांवर उपाय आणि मानवी आरोग्यासाठी उपयुक्त ठरतील असे पर्यावरणपूरक पदार्थ उपलब्ध करून देणारे “रूफ टॉप गार्डन’ हे शहरीकरणाच्या युगातील पर्यावरणीय संजीवनी ठरेल, असे मत पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

वाढत्या शहरीकरणामुळे नष्ट होणारी जैवविविधता आणि त्यामुळे उद्‌भवणाऱ्या पर्यावरणीय समस्या या आजच्या काळातील चिंतेचा विषय बनला आहे. यांचा सामना करण्यासाठी वृक्षारोपणाचा पर्याय समोर येत आहे, मात्र हे वृक्षारोपण करायचे कुठे? असा प्रश्‍न नागरिकांना पडत असतो. या प्रश्‍नावर उत्तर म्हणजे इमारतींच्या टेरेसवर अथवा रिकाम्या जागेत फुलवले जाणारे “रूफ टॉफ गार्डन’ इमारतींच्या आवारात फुलविल्या जाणाऱ्या या बागांमुळे जैवविविधता संवर्धनाला मोठा हातभार लागत असतो. तसेच याठिकाणी रसायनमुक्त शेती हा उपक्रम सोसायट्यांनी राबविल्यास त्याचा मोठा फायदा नागरिकांच्या आरोग्याला होईल.

रूफ़-टॉप गार्डनची वैशिष्ट्ये पाहता शहरातील व्यावसायिक वास्तूंमध्येदेखील अशा प्रकारच्या गार्डनचा अवलंब केला जात आहे. विशेषत: हॉटेल्स मध्ये “गार्डन थीम’ ही संकल्पना रूजत असून, त्याला ग्राहकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतो. वाढत्या शहरीकरणामुळे जागेचा अभाव निर्माण होत असल्याने सोसायट्यांमध्ये रूफ-टॉप गार्डन विकसित केल्यास त्या पर्यावरणासाठी ते अधिक फायदेशीर ठरतील असे, जागतिक पर्यावरणविषयक अभ्यासातून समोर आले आहे.

झुडपे, वेली, फळभाज्या, फुले आणि छोट्या वनस्पती अशा स्थानिक वनस्पतींच्या लागवडीतून जैवविविधता संवर्धन करणे पर्यावरणासाठी अधिक फायदेशीर ठरेल. स्वच्छ, शुद्ध हवा, विषमुक्त भाज्या, सुगंधी फुले यांमुळे नागरिकांचे आरोग्य निरोगी राहण्यासही मोठा फायदा होईल. तसेच सोसायटीच्या आवारात ही लागवड केल्याने लहान मुलांमध्येदेखील पर्यावरणाबाबत जवळीक निर्माण होईल. त्यामुळे नागरिकांनी “रूफ-टॉप’ गार्डनचा पर्याय अवलंबला पाहिजे.

– डॉ. सचिन पुणेकर, पर्यावरण अभ्यासक

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.