पुणे मेट्रोकडून पर्यावरण संवर्धनाचा ‘मार्ग’

पर्यावरणाची हानी न होता मार्गिकांचे काम


प्रदूषणही नियंत्रणात राहणार : महामेट्रोचा दावा

पुणे – पर्यावरण संवर्धनाचा दावा “महामेट्रो’ने केला असून, प्रदूषण नियंत्रणात यामुळे हातभार लागेल असेही म्हणणे आहे.

महामेट्रो पुण्यामध्ये गेल्या 2 वर्षांपासून मेट्रो रेल बांधकामाचे कार्य करत आहे. “पीसीएमसी’ ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी असे दोन मार्गिकांमध्ये बांधकाम सुरू आहे. या दोन्ही मार्गिकांची एकत्रित लांबी 31 किमी आहे. मेट्रोच्या आगमनानंतर मेट्रो प्रवासाइतक्‍या गाड्यांची संख्या पुण्यातील विविध रस्त्यांवरून कमी होणार आहे. सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत-जास्त वापर करण्यासाठी मेट्रोने मल्टिमोडल इंटरचेंज लक्षात ठेऊन पीएमपीएमएल, एमएसआरटीएस आणि रेल्वे स्थानकांना जोडण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत, असे “महामेट्रो’तर्फे सांगण्यात आले आहे.

या उपाययोजनांमध्ये मुख्यकरून पादचारी पूल, सरकते जिने, भूमिगत पादचारी मार्ग याद्वारे पीएमपीएमएल बसस्थानके, एसटी स्थानके, रेल्वे यांना जोडण्यात येणार आहे. लास्ट माईल कनेक्‍टिव्हिटी या योजनेअंतर्गत मेट्रो फीडर बस सेवा, इ-रिक्षा, सायकल आदी सुविधा काही मेट्रो स्थानकानांजवळ उपलब्ध करून देणार आहे. यामुळे रस्त्यावरच्या वाहनांची संख्या नियंत्रित ठेवण्यास मदत होणार असल्याचा महामेट्रोचा दावा आहे.

मेट्रो स्थानके व मेट्रोचे डेपो इथे मोठ्या प्रमाणावर सौर पॅनेल बसविण्यात येणार आहे. त्याद्वारे वीज निर्मिती होणार आहे. मेट्रोच्या उन्नत मार्गावरील साचलेल्या पावसाचे पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग तंत्रज्ञानाद्वारे जमिनीत सोडण्यात येणार आहे. त्यामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे, असेही महामेट्रोचे म्हणणे आहे.

मेट्रोचा ट्रॅक धुण्यासाठी ऑटोमॅटिक कोच वॉशिंग प्लान्टची व्यवस्था करण्यात येणार आहे. या प्लान्टमध्ये पाण्याचा पुनर्वापर करण्याची यंत्रणा असणार आहे. त्यामुळे पाण्याची बचत होईल. या व्यतिरिक्‍त मेट्रो स्थानके आणि इतर ठिकाणी बायोडायजेस्टर लावण्यात येणार आहे. मेट्रोने आतापर्यंत 14,645 नवीन झाडांची तळजाई, सहयोग केंद्र, आकुर्डी मेट्रो इको पार्क, खराडी एफएस न. 74, आर्मी कॅम्पस पिंपळे निलख, डेक्‍कन कॉलेज कॅम्पस आदी ठिकाणी रोपण झाले आहे.

1,681 झाडांचे पुनर्रोपण
या व्यतिरिक्‍त मेट्रो कामात 1,681 झाडांचे कासारवाडी एसटीपी, फॉरेस्ट ए. आर. ए. आय., डॉ. सलीम अली बर्ड सेंचुरी, अहमदनगर रोड साईड, डेक्‍कन एम्ब्रॉआयरी, रेंज हिल, के. ई. एस. गुरुकुल, पी. डब्लू.डी. ऑफिस, येरवडा ओपन जेल, बंड गार्डन, पीएमसी बंड गार्डन, नगर रस्ता, आरे डेअरी बसस्टॅन्डजवळ आदी ठिकाणी पुनर्रोपण केले आहे. मेट्रो कामादरम्यान धूलिकणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मेट्रो बांधकामाच्या ठिकाणी बाहेर पडणाऱ्या वाहनांची चाके धुण्यात येतात जेणेकरून रस्त्यावर माती, चिखल जाणार नाही. त्याद्वारे पर्यावरण संवर्धन होत असल्याचा दावा केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.