मुंबई – पूर्वी उद्योगांना परवानग्यांसाठी प्रदीर्घ काळ वाट पाहावी लागे. परंतू आज व्यापार सुलभीकरणामुळे उद्योग व्यवसाय करणे सोपे झाले आहे. देशात तसेच राज्यात अनेक स्टार्टअप व युनिकॉर्न कंपन्या निर्माण होत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये तेजीने होत असलेली प्रगती पाहता, देशातील नवउद्योजक भारताला जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता बनवतील, असा विश्वास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला.
औरंगाबाद येथे आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. भगतसिंह कोश्यारी म्हणाले, महाराष्ट्राच्या विविध भागात कौटुंबिक व्यवसायांमध्ये दुसऱ्या पिढीतील युवक युवती नवनव्या संकल्पना घेऊन आले आहेत. हे युवक युवती उच्च विद्याविभूषित असून त्यांना जागतिक व्यापार प्रवाहांची माहिती आहे. या युवा उद्योजकांच्या यशोगाथा वाचून शंभरपैकी दहा युवकांनी प्रेरणा घेतली तरी त्याचा त्यांना व राज्याला फायदा होईल, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राला गरवारे, जैन, किर्लोस्कर अशा अनेक औद्योगिक घराण्यांची परंपरा आहे. या कौटुंबिक उद्योगांमधील पुढची पिढी त्यांचे व्यवसाय जोमाने पुढे नेत आहेत. आज डिजिटल क्षेत्र तसेच हरित ऊर्जा क्षेत्रात देश दैदिप्यमान प्रगती करीत आहे. त्यामुळे आगामीकाळात देशाची अर्थव्यवस्था केवळ 5 ट्रिलियन डॉलर इतकीच नाही 10 ट्रिलियन डॉलर देखील होऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.