मुंबई – वाढता कोविड प्रादुर्भाव पहाता उद्योग जगताने काही कालावधीसाठी कारखान्यात आवश्यकते एवढेच कामगार बोलवावेत, प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उद्योगांना त्यांच्या कारखान्याच्या आवारातच कामगारांची राहण्याची व्यवस्था करणे शक्य आहे ती त्यांनी करावी, जिथे “वर्क फ्रॉम होम’ करणे शक्य आहे तिथे ते केले जावे, जो कामगार कोविडबाधित होईल त्या कामगाराच्या भले ही तो कंत्राटी कामगार असेल त्याच्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन त्यांची रोजीरोटी चालू राहील याची काळजी घ्यावी, असे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड विरोधात लढतांना एका कुटुंबाप्रमाणे आपण एकत्रितरित्या या संकटाला सामोरे जाऊ आणि त्यावर मात करू असे आवाहन केले.
मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देताना उद्योग जगत शासन आणि मुख्यमंत्री यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि राहील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. सध्या लोकांचा जीव वाचवण्याला प्राधान्य असल्याने शासन जो निर्णय घेईल त्याला सहकार्य करण्याची उद्योग जगताची तयारी असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
त्यांनी 247 लसीकरण व्हावे, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे, निर्बंधांचे पालन न करणाऱ्यांना कडक दंड लावावा, शिस्तबद्ध वर्तणुक राहील यासाठी कडक नियमावली तयार करावी, लोकांचा रोजगार सुरु राहील हे पहावे, जिथे शक्य आहे तिथे वर्क फ्रॉम होम च्या सुचना द्याव्यात अशा विविध अपेक्षा व्यक्त केल्या तसेच शासन कोविड नियंत्रणासाठी करत असलेल्या अथक प्रयत्नांचेही उद्योग जगतातील प्रतिनिधींनी अभिनंदन केले.
कोविडच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील प्रमुख उद्योजकांसमवेत दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस उद्योग मंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, यांच्यासह राज्यातील प्रमुख उद्योजक उपस्थित होते.
अनर्थ रोखायचा तर अर्थचक्र बाधित होते आणि अर्थचक्र सुरु ठेवायचे तर अनर्थ होतो या कात्रीत आपण सापडले असून या संकटकाळात मित्र होऊन सोबत राहणे महत्त्वाचे असते, राज्यातील उद्योग जगताने नेहमीच मित्रत्वाच्या भावनेने शासनास आतापर्यंत मदत केली आहे, सहकार्य केले आहे त्याबद्द्ल मुख्यमंत्र्यांनी त्यांना धन्यवाद दिले.
राज्याची 247 लसीकरणाची तयारी आहे. जिथे 20 बेडस आहेत त्या आरोग्य केंद्रात लसीकरणाची परवानगी घेण्यात आली आहे. लसीकरण करतांना लसीची सुरक्षितता ही महत्त्वाची आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या देखरेखीत लसीकरणाला प्राधान्य दिल्याचेही ते म्हणाले.
काही कडक नियम लावणे गरजेचे
शासन लॉकडाऊनच्या बाजूने नाही, इंडस्ट्री चालू राहिलीच पाहिजे परंतू ती चालू ठेवतांना काही कडक नियम लावणे ही गरजेचे असल्याचे ते म्हणाले. काही उद्योजकांनी स्थानिक वस्त्यांमध्ये कोरोना प्रतिबंधक वर्तन होण्याच्या दृष्टीने स्वयंसेवक होऊन काम करण्याचीही तयारी दाखवल्याबद्दल आभार व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांना त्यांच्या कामगारांना मास्क लावण्याची शिस्त लावण्याचे, त्यांच्या वेळोवेळी कोरोना टेस्ट करून घेण्याचे आवाहन केले.