कोरोनाशी लढताना उद्योजकांनी प्रशासनास सहकार्य करावे : जिल्हाधिकारी नवल किशोर राम

बारामती : बारामती शहर व ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज बारामतीमधील महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीचे विश्रामगृह येथे बारामती तालुक्यातील उद्योजकांनी लॉकडाऊन कालावधीमध्ये प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले.

यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, नगरपरिषद मुख्याधिकारी किरणराज यादव,तहसीलदार विजय पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे व बारामती एमआयडीसी मधील सर्व उद्योजक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राम यांनी बारामती येथे करण्यात येणाऱ्या लॉकडाऊनच्या कालावधीत उद्योजकांना येणाऱ्या अडचणी व शंका जाणून घेतल्या आणि त्यांच्या अडचणी व शंकांचे निरसन केले.

यावेळी जिल्हाधिकारी राम म्हणाले की, लॉकडाऊन काळात उद्योग चालू राहणार असून त्यांना कोणत्याही अडचणी येऊ दिल्या जाणार नाहीत. तसेच प्रत्येक उद्योजकाने त्यांच्या कारखान्यामधील कामगारांमध्ये कोरोना बाबत जागृती करणे व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. कामगारांनी कारखान्यामध्ये मास्क व सॅनिटायझरचा वापर तसेच सामाजिक अंतर राखणे देखील गरजेचे आहे. तसेच प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

कामगारांना पोलीस प्रशानाकडून देण्यात येणाऱ्या परवान्याचा गैरवापर होता कामा नये, असे झाल्यास संबंधित कामगारावर कारवाई करण्यात येणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. उद्योजकांस काही अडचण असल्यास त्यांनी तात्काळ उपविभागीय अधिकारी , बारामती यांच्याशी संपर्क साधावा. तसेच लॉकडाऊन कालवधीमध्ये उद्योजकांनी शक्य असल्यास कामगारांची कंपनीच्या परिसरामध्येच  राहण्याची सोय करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.