लघु उद्योग संघटनेची मागणी : थकबाकी भरण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ द्यावी
पिंपरी – “करोना’मुळे सध्या उद्योग आणि उद्योजक आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यातच अवास्तव वीज बिलांचा त्यांच्यावर अतिरिक्त भार पडत आहे. त्यामुळे, वीज बिलाची थकबाकी आणि आकारणी पद्धतीविषयी विविध मागण्या पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या आहेत.
संघटनेने म्हटले आहे की, सध्या उद्योजकांना अर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने वीज बिलापोटी घेण्यात येणारा विजेचा स्थिर मागणी आकार 6 महिन्यासाठी रद्द करण्यात यावा. तसेच मार्च-20 ते जून 2020 या 4 महिनाच्या वीज बिलाची थकबाकी भरण्यासाठी जुलै -20 ते डिसेंबर 20 असे 6 मासिक हप्ते बिना व्याज विना दंड पद्धतीने मंजूर करण्यात यावे.
उद्योगांचा नियमित पावर फॅक्टर 0.9 वा अधिक होता तो 0.1 ते 0.3 पर्यंत खाली आला आहे. त्यामुळे या उद्योगांना पावर फॅक्टर पेनल्टीमुळे दीड पट बिलिंग झाले आहे. त्यामुळे 22 मार्च पासून 6 महिन्याच्या कालावधीसाठी लघुदाब उद्योगांच्या बिलिंगमधील पॉवर फॅक्टर पेनल्टी पूर्णपणे रद्द करण्यात यावी. 1 एप्रिल 2020 पासून केव्हीएएच आधारे बिलिंग आकारणी सुरु केली आहे. त्यामुळे किमान सव्वा ते दीड पट ते कमाल वीसपट इतक्या जादा युनिटची आकारणी झालेली आहे.
22 हजार ग्राहक देतात 43 टक्के महसूल
राज्यातील या सर्व उच्चदाब ग्राहकांची संख्या फक्त 22000 आहे. तथापि महावितरणला सर्वधिक 43 टक्के महसूल नियमित भरणारे ग्राहक आहेत. राज्याची अर्थव्यवस्था रुळावर येण्यासाठी हे सर्व उद्योग पूर्ण क्षमतेने लवकरात लवकर सुरु होणे आवश्यक आहे. त्यासाठी केव्हीएएच पद्धतीची आकारणी तात्पुरती एका वर्षासाठी रद्द करण्यात यावी व एक वर्षासाठी पूर्वीच्याच पद्धतीनुसार आकारणी करण्यात यावी. नवी पद्धत खर्चिक असल्यामुळे आज तातडीने त्यांच्यावर बोजा न टाकता त्यांना पुरेसा वेळ देणे आवश्यक आहे.