पुणे – व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केल्यास, त्यांना शुल्काचा पूर्ण परतावा देण्याचे निर्देश अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) सर्व शैक्षणिक संस्थांना दिले आहेत.
या निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे “एआयसीटीई’ने म्हटले आहे. त्यामुळे प्रवेशाच्या नावाखाली शुल्क वसूल करणाऱ्या शैक्षणिक संस्थांना पायंबद बसणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
करोना पार्श्वभूमीवर एआयसीटीईचे सदस्य सचिव प्रा. राजीव कुमार यांनी परिपत्रकाद्वारे देशातील सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण देणाऱ्या खासगी इन्स्टिट्यूट, अभिमत व खासगी विद्यापीठे, शैक्षणिक संस्था यांना आदेश दिले आहेत.
अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन, हॉटेल मॅनेजमेंट अशा व्यावसायिक शाखांमधील अभ्यासक्रमांना प्रवेश घेतल्यावर विद्यार्थ्यांना 10 नोव्हेंबरपर्यंत प्रवेश रद्द करता येईल. शैक्षणिक संस्थांना केवळ एक हजार रुपये प्रोसेसिंग शुल्क वजा करता येणार असल्याचे “एआयसीटीई’ने स्पष्ट केले.