अतिक्रमण नियंत्रण विभाग सुसाट

आजपासून पुन्हा कारवाईचा जोरदार धडाका
गेल्या चार दिवसांत अडीचशे टपऱ्या केल्या सील
पुणे –
येत्या सोमवारपासून अतिक्रमण नियंत्रण विभाग कारवाईचा जोरदार धडाका लावणार आहे. रोज किमान 100 अनधिकृत टपऱ्या, पथारी व्यावसायिकांवर कारवाई करणार आहे. गेल्या चार दिवसांत विभागाने अडीचशे टपऱ्या सील केल्या आहेत.

शिवाजीनगर गेट नं. एक, जंगली महाराज रस्त्यावरील रामगढी, सुरभी हॉलजवळील गल्ली, हॉंगकॉंग लेन, डेक्कन येथील आर्यभूषण मुद्रणालयाच्या बाजूची लेन, टिळक रस्त्यावरील अशिक विद्यालयाजवळील खाऊ गल्ली, डेंगळे पूल, फडगेट पोलीस चौकीजवळील टपऱ्या या ठिकाणी अतिक्रमण नियंत्रण विभागाने गेल्या चार दिवसांत कारवाई केली.

भाडे न भरणे, परवाना भाडे पट्ट्याने इतराला चालवायला देणे, टपरीमध्ये पोटभाडेकरू ठेवणे असे प्रकार आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये टपरी सील करून त्यांचा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येत असल्याचे, महापालिकेचे अतिक्रमण नियंत्रण विभागप्रमुख माधव जगताप यांनी सांगितले. दंड भरून, त्यांच्याकडून हमीपत्रही लिहून घेतले जाणार असून, सोमवारपासून ही कारवाई तीव्र करण्यात येणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले. रोज किमान 100 जणांवर कारवाई करण्याचे टार्गेट ठरवल्याचे ते म्हणाले.

थकबाकीदारांची संख्या सहा हजारांच्या आसपास असून, ही रक्‍कम आठ कोटी रुपयांच्या घरात आहे. परवाना आणि टपऱ्या ज्यांना देण्यात आल्या आहेत, त्यातील सुमारे 70 टक्के परवानाधारकांनी त्या दुसऱ्यांना दिल्या आहेत. वास्तविक त्यांनी तेथे व्यवसाय करणे अपेक्षित असताना ते पोटभाडेकरू ठेवत असल्याने त्यांच्यावरही कारवाई करण्यात येत असल्याचे जगताप यांनी नमूद केले.

Leave A Reply

Your email address will not be published.