फटाक्यांचे दर यंदा 15 टक्क्यांनी जास्त
सातारा – दीपावली सण दोनच दिवसांवर येऊन ठेपला असला, तरी जिल्हा परिषद मैदानावर फटाक्यांच्या खरेदीसाठी गर्दी कमी असल्याचे जाणवत आहे. यंदा फटाक्यांच्या किमतीत 15 टक्के वाढ झाल्याने लोकांच्या खरेदीच्या उत्साहाला मर्यादा आल्या आहेत. यंदा कमी आवाजाच्या “इको फ्रेंडली’ फटाक्यांना मागणी आहे.
साताऱ्यात फटाक्यांच्या महागाईचाही धमाका उडाला आहे. यावर्षी 15 ते 20 टक्क्यांनी दर वाढल्याने शहरातील विक्रेत्यांनी नेहमीच्या तुलनेत 50 टक्के माल मागवला आहे. त्यामुळे बाजारात फटाक्यांची आवकही निम्म्याने घटली आहे. जागतिक बाजारात इंधनाचे दर वाढल्याने, त्याचा परिणाम प्रत्येक क्षेत्रावर पाहायला मिळत आहे.
इंधन दरवाढीने माल वाहतुकीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे फटाके बाजारावर चांगलाच परिणाम झाला आहे. फटाक्यांच्या दरावर प्रकाश टाकल्यास, गतवर्षीच्या तुलनेत यंदा 15-20 टक्के दर जास्त असल्याने विक्रेत्यांनी आपले बजेट बघून कमी माल मागवला आहे.
यंदा फटाके विक्रेत्यांचीही संख्या घटली आहे. जिल्हा परिषद मैदानावर दरवर्षी 45 ते 50 स्टॉल लागतात. यंदा ही संख्या कमी आहे. दिवाळीच्या दहा दिवस आधी फटाके विक्रीला सुरुवात होते; परंतु यंदा कमी प्रतिसाद मिळतोय. फॅन्सी आणि ग्रीन फटाक्यांच्या किमती तीनशे रुपयांपासून पुढे आहेत. कागदी लक्ष्मी बॉम्ब, सुतळी बॉम्ब या पारंपरिक फटाक्यांच्या पेट्या 270 ते 320 रुपयांना उपलब्ध आहेत.
मोठा लवंगी फटाका व आपटबार 160 ते 180 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. याच प्रकारातील कमी आवाजाचे, इको फ्रेंडली फटाके यंदा उपलब्ध झाले असून, या फटाक्यांना मागणी आहे. मॅजिक पॉप, ड्रॅगन फाइट, मायाजाल पोगो, पॉपकॉर्न अशा नावांच्या फटाक्यांना बच्चे कंपनीची पसंती आहे. या फॅन्सी फटाक्यांच्या किमती 450 ते 750 रुपयांच्या दरम्यान आहेत.
गतवर्षी करोनामुळे फटाका विक्रेत्यांचे नुकसान झाले, तर यंदा महागाईचा फटका बसला आहे; परंतु येत्या दोन दिवसांत फटाके खरेदीसाठी गर्दी होईल. शासनाने नियमात सूट दिल्याने फटाका विक्रीत 15 ते 20 टक्के वाढ होईल, अशी अपेक्षा विक्रेत्यांना आहे.