शहरातील चारशे महिलांना प्रशिक्षणाबरोबर मिळणार परवाना
कराड – कराड नगरपरिषदेच्यावतीने महिला व बालकल्याण समितीमार्फत कराडमधील चारशे महिलांना दुचाकी व चारचाकी वाहनांचे प्रशिक्षण मोफत देण्याच्या प्रशिक्षणाचा शुभारंभ गुरूवारी येथील दत्त चौकात करण्यात आला. या प्रशिक्षणात महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. दरम्यान या प्रशिक्षणात लायसनही मिळणार असल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान, शारदा जाधव, कश्मिरा इंगवले, विद्या पावसकर, अंजली कुंभार, अर्चना ढेकळे, आशा मुळे, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, नगरसेवक विनायक पावसकर, बांधकाम सभापती हणमंतराव पवार, नियोजन सभापती विजय वाटेगावकर, बाळासाहेब यादव, किरण पाटील, वैभव हिंगमिरे, मोहसिन आंबेकरी, सुहास जगताप, शिवाजी पवार, मुख्याधिकारी यशवंत डांगे, महिला व बालकल्याण समुपदेशक दिपाली रेपाळ, गीता यादव यांची उपस्थिती होती.
यावेळी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे म्हणाल्या, आज महिला सर्व क्षेत्रात पुढे असून महिलांनी ड्रायव्हिंग शिकणे ही आजची गरज आहे. हा उद्देश नजरेसमोर ठेवून ही मोहिम हाती घेतली आहे. महिलांना ड्रायव्हिंग प्रशिक्षण मोफत देणार देण्यात येणार असून ड्रायव्हिंग पूर्ण झाल्यानंतर लायसन्स ही त्यांना देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी येणारा खर्च नगरपालिका करणार आहे.
स्मिता हुलवान म्हणाल्या, आधुनिकीकरणाच्या युगामध्ये महिला सक्षम झाल्या पाहिजेत, हा हेतू ठेवून नगरपालिका सदरचा कार्यक्रम राबवत आहे. या उपक्रमातून महिलांनी एसटी महामंडळाच्या बसचालक अथवा खासगी रिक्षा चालक म्हणून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लागेल या पद्धतीने प्रयत्न करावा. आपत्कालीन परिस्थितीमध्ये घरात दुचाकी व चारचाकी वाहन असूनही केवळ ड्रायव्हिंग येत नसल्यामुळे बाका प्रसंग येऊ शकतो. यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे.