नवी दिल्ली – पुढील वर्षी 27 मार्च 2022 रोजी 94वे अकादमी पुरस्काराचे आयोजन करण्यात येणार आहे. दरवर्षी भारतीय चित्रपटातील अनेक चित्रपट ऑस्करसाठी नामांकित केले जातात. यावेळी विद्या बालन स्टारर “शेरनी’ आणि विकी कौशल स्टारर “सरदार उधम सिंह’ हे चित्रपट “ऑस्कर 2022′ साठी नामांकित झाले आहेत.
दरवर्षी ज्युरी ऑस्करसाठी अनेक चित्रपटांची निवड करते. ज्यूरीने भारतीय चित्रपटांमधून 14 चित्रपटांची निवड केली आहे. यापैकी फक्त एक अंतिम प्रवेशामध्ये समाविष्ट केला जाईल. या 14 चित्रपटांमध्ये मल्याळम चित्रपट “नायतू’, तामिळ चित्रपट “मंडेला’, विद्या बालनचा हिंदी चित्रपटांमधील “शेरनी’ आणि नुकताच प्रदर्शित झालेला विकी कौशलचा “सरदार उधम सिंह’ यांचा समावेश आहे.
परदेशी श्रेणीतील सर्वांत मोठे दावेदार मानले जाणारे चित्रपट म्हणजे विद्या बालनचा “शेरनी’. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित व्ही मसूरकर यांनी केले आहे. या चित्रपटात विद्या बालनने एका वन अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे जी मनुष्यभक्षक वाघाला पकडण्याचा प्रयत्न करते.
दुसरीकडे “सरदार उधम सिंह’ चित्रपटात विकी कौशल क्रांतिकारी सरदार उधम सिंहच्या भूमिकेत आहे. 1919च्या जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला म्हणून एका ब्रिटिश अधिकाऱ्याला गोळ्या झाडणाऱ्या एका क्रांतिकारकाची कथा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शूजित सरकार यांनी केले आहे.