अबाऊट टर्न: मनोरंजन…

हिमांशू

इंडियन प्रीमिअर लीग किंवा प्रो कबड्डी लीगप्रमाणं देशातील राजकीय पक्षांची कुस्ती लीग सुरू करावी की बिग बॉसप्रमाणं एखादा अतर्क्‍य रिऍलिटी शो सुरू करावा? असा प्रश्‍न सध्या पडलाय. निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला असला तरी अजून सहा टप्पे व्हायचेत आणि या काळात आणखी काय-काय बघणं किंवा ऐकणं नशिबात आहे, याचा अंदाजच येईनासा झालाय. राजकारणातील संस्कृतीबद्दल,वक्‍तव्यांबद्दल,हाणामाऱ्यांबद्दल आणि कुरघोड्यांबद्दल कोणत्या पक्षाला झाकावं आणि कोणत्या पक्षाला काढावं असा प्रश्‍न पडलाय. या सगळ्या गदारोळात ऍक्‍शन आहे, इमोशन आहे, ड्रामा आहे, कॉमेडी आहे… सगळं काही आहे. नाहीत ते फक्त जनतेचे प्रश्‍न.

पक्षांतर्गत गटबाजी, हमरीतुमरी आणि लाथाळ्यांबद्दल कॉंग्रेसच्या नावानं खडे फोडणाऱ्या भाजपमध्येही अखेर ही संस्कृती आलीच.पक्षाचे संकटमोचक मानल्या जाणाऱ्या नेत्याच्या जळगावात जे काही घडलं, ते पाहता पार्टी विथ डिफरन्स म्हणजे काय रे भाऊ, असं विचारण्याची वेळ आलीय. आधी एकाला तिकीट द्यायचं ठरलं म्हणून दुसऱ्याचा गट नाराज झाला. मग पहिल्याचं तिकीट रद्द करून ते तिसऱ्याला मिळालं तेव्हा पहिल्याचा गट नाराज झाला. अशा परिस्थितीत पक्षाचा मेळावा वगैरे घ्यायचा म्हणजे धाडसच की… या नेत्याने हे धाडस दाखवलं आणि भर मेळाव्यात फ्री स्टाईल कुस्ती रंगली.

मातीवरची कुस्ती मॅटवर आणि मॅटवरून आता थेट मंचावर आली, हे एक बरं झालं. कुस्तीसारख्या मराठमोळ्या खेळाला अधिकाधिक प्रेक्षकवर्ग मिळायला हवा आणि त्यासाठी कुस्तीचा अशा प्रकारे विस्तार व्हायलाच हवा. गर्दी खेचण्याच्या बाबतीत राजकीय मंचापेक्षा अधिक सक्षम दुसरं स्थळ नाही. गच्च भरलेल्या व्यासपीठावर जेव्हा माणसं टोप्या वगैरे न घालता हेल्मेट घालून येऊ लागतील, तेव्हा लोकशाही खऱ्या अर्थानं प्रगल्भ झाली असं म्हणता येईल. तिकडे उत्तर प्रदेशात कॉंग्रेसनं काल सस्पेन्स थ्रिलरची वातावरण निर्मिती केली. राहुल गांधींच्या कपाळावर हिरवा लेसर किरण पडला आणि त्यांना लेसर गनपासून धोका असल्याची तक्रार पक्षानं नोंदवली. दोन-तीन तास गेले आणि विशेष सुरक्षा दल तपासणी करू लागलं. पण डोंगर पोखरून अखेर उंदीर निघाला. राहुल यांच्या कपाळावरचा तो किरण एका कॅमेरामनच्या मोबाइलमधल्या लाइटचा होता, हे स्पष्ट झालं. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना तो किरणोत्सर्ग वाटला नाही, हे नशीब. पाठीवर पान पडलेल्या सशाची ही कहाणी संपते ना संपते तोच कर्नाटकातून एक भन्नाट बातमी आली. तिथले एक उमेदवार कुठल्याशा गावात प्रचारासाठी गेले आणि अचानक नाचायलाच लागले. जुन्या नागीन सिनेमामधलं गाणं ध्वनिक्षेपकावर सुरू होतं.

नाचून दाखवून पैसे मागणारी माणसं ठाऊक होती, पण नाच करून मतं मागणारा उमेदवार पहिल्यांदाच लोकांना दिसला. हे महाशय मंत्रिमंडळात असून, त्यांचं नावच नागराज असल्यामुळं त्यांनी नागीन डान्स केला, अशीही मनोरंजक माहिती मिळाली.

इकडे भारताच्या मिशन शक्तीबद्दल अत्यंत उद्‌बोधक माहिती मंचावरून देणाऱ्या चंद्रकांतदादांनी राष्ट्रवादीच्या हेवीवेट उमेदवाराचा पराभव करण्यासाठी कार्यकर्त्यांना घरातल्या भिंतीवर काही मजकूर खडूनं लिहून ठेवण्याचा सल्ला दिला. उमेदवार तर शेतात काम करण्यापासून श्रमदानापर्यंत काहीही करतायत. एकंदरीत, फुल टाइमपास चाललाय.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.