पिंपरी – काही कामानिमित्त मी मुंबईला गेले होते. त्या वेळी जबरदस्तीने, मनाविरूद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करून घेतला. प्रवेश केला असल्याच्या चुकीच्या बातम्या पसरवल्या, असा आरोप उत्तर भारतीय जिल्हा संघटक कामिनी मिश्रा यांनी केला आहे. मी पहिल्या पासून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत काम करत आहे. पुढेही येथेच काम करेन असेही मिश्रा यांनी व्हीडीओद्वारे जाहिर केले आहे.
मिश्रा म्हणाल्या की, कामानिमित्त मुंबईला गेले होते. त्या वेळी हातातील शिवबंधन काढण्यात आले. मी मरेपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेत काम करणार आहे. मला फसवून विनापरवानगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील करून घेतले. महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरेंचा आहे. त्यांच्या शिवसेनेपासून मला कोणीही दूर करू शकत नाही. मी आता पर्यंत सामाजिक काम करत होते. मात्र माझ्याबाबतीत घाणेरडे राजकारण करण्यात आले आहे. आता जोरदार काम करत महिला राजकारण कसे करते, हे दाखविणार असल्याचा इशारा मिश्रा यांनी दिला आहे.
तर मिश्रा या स्वतःहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला असल्याचे मुख्यमंत्री शिंदे गटाचे पदाधिकारी म्हणत आहेत. मिश्रा यांना कधीही संपर्क केला नाही. त्यांचा जबरदस्तीने प्रवेश करवून घेतला नाही, असे मुख्यमंत्री शिंदे गटाचे पदाधिकारी सांगत आहेत.