नवी दिल्ली : उन्नाव बलात्कार प्रकरणात भाजपाचा निलंबित आमदार कुलदीप सेंगर याला शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सत्र न्यायलयाने ठोठावली. त्याला 25 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. 2017मध्ये उन्नाव बलात्कार प्रकरणात सेंगर दोषी असल्याचे सोमवारी जाहीर करण्यात आले होते. त्याला शिक्षा शुक्रवारी ठोठावण्यात आली.
सेंगरला जन्मठेपेची शिक्षा द्यावी कारण हा न्यायासाठी यंत्रणेविरूध्द व्यक्तीगत स्वरूपाचा लढा होता, असा युक्तीवाद सीबीआयच्या वकीलांनी केला. या राजकीय नेत्याला कायद्यानुसार सर्वोच्च अशी जन्मठेपेची शिक्षा द्यावी अशी विनंती केली. ही शिक्षा ठोठावताना न्यायालयाने त्या मुलीचा आक्रोश ऐकायला हवा असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर या आरोपीला जबरी आर्थिक दंडही ठोठावण्याची विनंती सीबीआयच्या वकीलांनी न्यायालयाला केली.
त्याला सेंगरच्या वकीलांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले, केंगरचे पूर्व चारीत्र्य गुन्हेगारीचे नाही. त्यामुळे त्याला किमान दहा वर्ष शिक्षा द्यावी. त्यांची राजकीय कारकिर्दही डागरहित आहे. जनतेतून ते 2002पासून सातत्याने थेट निवडून येत आहेत.
सेंगर दोषी असल्याचे न्यायालयाने सोमवारी जाहीर केले होते. त्याच्यावर भारतीय दंड संहिता आणि पॉस्को कायद्यान्वये दोषारोप ठेवण्यात आले होते. ही घटना घडली तेंव्हा पिडीता अल्पवयीन होती.