ऐतिहासिक व धार्मिक स्थळांचे संवर्धन गरजेचे

तालुक्‍याला ऐतिहासिक फार मोठी परंपरा आहे. सासवडमध्ये संत सोपानदेव यांची समाधी आहे, किल्ले पुरंदर हे छत्रपती संभाजी महाराज यांचे जन्मस्थळ तर याच किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या भिवडी हे क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे जन्मगाव. खानवडी हे क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई यांचे गाव आहे. सासवडमधील पेशवेकालीन मस्तानी महाल, तर तेथून हाकेच्या अंतरावर महापराक्रमी सरदार गोदाजी राजे जगताप यांचे स्थळ आहे. येथील सर्व समाधी स्थळांचे संशोधन होणे गरजेचे असून त्याची जपणूक करून पुढील पिढीला महिती होणे गरजेचे आहे.

सिद्धेश्‍वर मंदिराच्या परिसरात जगताप घराण्याचे मूळ पुरुष व सासवडचे संस्थापक हरजी राजे जगताप यांची समाधी आहे. जेजुरी येथील खंडोबा मंदिर, सोनोरी येथील मल्हार गड, माळशिरस येथील भुलेश्‍वर मंदिर, वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर, सासवड येथील कऱ्हेचे पाणी आणि आचार्य अत्रे हे समीकरण संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. याच कऱ्हेच्या काठावर वसलेल्या जेजुरी नाका येथे पेशवाईतील प्रसिद्ध शाहीर आणि तमासगीर होनाजी बाळा यांचे स्मृतीस्थळ असून त्यामुळे पुरंदरच्या इतिहासात आणखी भर पडली आहे.

“घनश्‍याम सुंदरा, श्रीधरा, अरुणोदय जाहला’ या अमर भूपाळीने संपूर्ण राज्याला वेड लावले. प्रतिभावंत, बुद्धिवंत शाहीर, तमासगीर म्हणून प्रसिद्ध असलेले शाहीर होनाजी व बाळा यांच्या स्मृतीस्थळांचा वारसा जतन करण्याची गरज आहे. होनाजी आणि बाळा या दोन स्वतंत्र व्यक्ती आहेत. यातील होनाजी अर्थात होनाजी सयाजी शिलारखाने यांचे कुटुंब त्यांच्या पणजोबापासून बाळाजी विश्‍वनाथ पेशवे यांनी कोकणातून सासवड येथे आणले. होनाजी सासवडमधील मुख्य बाजारपेठेतील अमर चौकातील एका दुमजली इमारतीत राहत होते. ती इमारत आजही अस्तित्वात आहे. गायी, म्हशी पाळणे हा त्यांचा व्यवसाय. होनाजीचे आजोबा साताप्पा, चुलते बाळा बहिरू व मुले कुशाबा व बाळाजी हा व्यवसाय चालवत होते. होनाजी यांना त्यांचा मित्र बाळा यांची चांगली साथ मिळाली. बाळा अर्थात बाळा करंजकर. एकाने उत्तम कवने करावी व दुसऱ्याने ती गावी हा त्यांचा शिरस्ता होता. त्यामुळे ती दोघे एकाच नावाने प्रसिद्ध होते व आजही आहेत. दोघेही सासवडचे आणि पेशवाई काळातील असलेले थोड्यांना माहीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.