विंडीजवर 269 धावांनी मात; मालिका 2-1 ने जिंकली
मॅंचेस्टर – स्टुअर्ट ब्रॉडच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर यजमान इंग्लंडने वेस्ट इंडिजवर 269 धावांनी मात करत दणदणीत विजयाची नोंद करत तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली.
विजयासाठी 389 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी सपशेल हार पत्करली. ब्रॉडने पहिल्या डावात 6 बळी घेतले होते. दुसऱ्या डावात 4 गडी बाद करत सामन्यात 10 गडी बाद करण्याची कामगिरी केली. त्याला सुरेख साथ देताना ख्रिस वोक्सनेही 5 गडी बाद केले.
या दोन संघांतील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील हा तिसरा व निर्णायक कसोटी सामना होता. या सामन्यासह मालिका जिंकण्याची दोन्ही संघांना समान संधी होती. मात्र, वेस्ट इंडिजच्या प्रमुख फलंदाजांना आलेले अपयश इंग्लंडच्या पथ्यावर पडले. पहिल्या डावात त्रिशतकी मजल मारल्यानंतर इंग्लंडने वेस्ट इंडिजला द्विशतकी धावांच्या आत रोखले व मोठी आघाडी घेतली.
वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावात इंग्लंडच्या ब्रॉडने 6 गडी बाद केले व सामना इंग्लंडकडे झुकवला. इंग्लंडने दुसरा डाव सुरू केल्यावर आक्रमक फलंदाजी केली व सव्वादोनशे धावांवर डाव घोषित केला व वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 389 धावा करण्याचे आव्हान ठेवले. याही डावात ब्रॉडने अफलातून स्विंग गोलंदाजीचे दर्शन घडवले.
सामन्याचा चौथा दिवस पावसाने वाया गेल्याने वेस्ट इंडिजचा पराभव लांबणीवर पडला. मंगळवारी सामन्याच्या पाचव्या व अखेरच्या दिवशी वेस्ट इंडिजचे सहा फलंदाज तंबूत परतले होते. त्यावेळी पुन्हा एकदा पावसाला प्रारंभ झाला होता.
संक्षिप्त धावफलक
संक्षिप्त धावफलक – इंग्लंड पहिला डाव – 369. वेस्ट इंडिज पहिला डाव – 197. इंग्लंड दुसरा डाव – 2 बाद 226 घोषित. वेस्ट इंडिज दुसरा डाव – 37.1 षटकांत सर्वबाद 129. (शाय होप 31, जेरेमी ब्लॅकवूड 23, शेमार ब्रुक्स 22, ख्रिस वोक्स 5/50, स्टुअर्ट ब्रॉड 4/36).